मीरा रोड - देशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समाजाचे मोठे योगदान आहे. जैन समाजाने कल्याणाची एक व्यवस्था उभी केली आहे. देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान अद्भुत आहे. जैन समाज जेवढे घेतो, त्यापेक्षा जास्त समाजाला देतो, म्हणून जैन समाज मोठा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.जैनधर्मीयांचे आचार्य विजय पद्मसागर सुरीश्वरजी यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त भार्इंदर पश्चिमेच्या कस्तुरी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मध्य प्रदेश व छत्तीसगढच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, आ. मंगलप्रभात लोढा व नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता, नयपद्मसागर महाराज आदी उपस्थित होते.जैन महाराज उपहार घेत नाहीत, ते उपहार म्हणून आशीर्वाद देतात, तो मोलाचा आहे. मीरा-भार्इंदरच्या जनतेने आम्हाला खूप आशीर्वाद दिले. महापालिका निवडणुकीत आ. मेहता यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश दिले. आचार्य नयपद्मसागर महाराज यांनीसुद्धा खूप आशीर्वाद दिले. डिम्पल मेहता महापौर झाल्या. मीरा-भार्इंदरसाठी आम्ही मेट्रो मंजूर केली आहे. आज ज्या ठिकाणी हा जन्मोत्सव कार्यक्र म होत आहे, त्याच्या मागेच मेट्रोचे स्टेशन होणार आहे. त्या मेट्रो स्टेशनला स्वामी महावीर यांचे नाव देणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.आचार्य पद्मसागर महाराज यांनी राष्ट्र, समाज व जीवदया यासाठी मोठे कार्य केले आहे. ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे आशीर्वाद असतील तर मेट्रोसारखी आणखी अनेक कामे आपण करू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.केरळमधील नैसर्गिक आपत्तीत आचार्यदेव नयपद्मसागरजी महाराजांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारच्या जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी आचार्यदेव अभयसुरीश्वरजी महाराज, आचार्यदेव अरविंदसागरजी महाराज, आचार्यदेव मनोभूषणविजयजी महाराज, आचार्यदेव प्रशांतसागरजी महाराज, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, माजी आ. मुझफ्फर हुसेन, माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा आदींनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
‘अर्थव्यवस्थेत जैन समाजाचे मोठे योगदान’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 03:02 IST