लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. मराठवाडा विदर्भ या भागात या आंदोलनाने हिंसक वळण घेत आता आपला मोर्चा आमदार खासदार या लोकप्रतिनिधींकडे वळवलेला आहे.त्यामुळेच आमदार खासदार यांच्या निवासस्थानांसह कार्यालयावर हल्ले होत असून त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयासमोर असलेल्या कोणार्क आर्केड या इमारतीमध्ये स्थानिक खासदार तथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे व समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेख यांचे कार्यालय असल्या कारणाने त्या ठिकाणी तसेच त्यांच्या निवासस्थानी देखील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.भिवंडी शहारात मराठा आंदोलन सूरू असल्यानं शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून शहरातील आमदार खासदार यांच्या कार्यलयांबाहेर तसेच निवस्थानी पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत खासदार आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ
By नितीन पंडित | Updated: October 31, 2023 13:35 IST