अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:13+5:302021-06-18T04:28:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण ...

Improper construction on state highway in Ambernath | अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जबडा फाटला आहे.

अंबरनाथला राहणारा त्रिंबक काळे हा तरुण रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी फॉरेस्ट नाक्याच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे तो या भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला. अपघातात त्रिंबक याचा जबडा फाटला. या घटनेनंतर सुरुवातीला त्याच्यावर उल्हासनगरच्या सरकारी मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तिथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्याच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर तीन ठिकाणी मधोमध अशाच पद्धतीने गोलाकार भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीखालून एमआयडीसी, महावितरण यांच्या युटीलीटी वाहिन्या गेल्या आहेत. या महामार्गाचे काँक्रिटीकरण करताना या वाहिन्या एका बाजूला स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र संबंधित यंत्रणांनी निधीअभावी या कामात फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे अखेर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करता यावी, यासाठी काही ठिकाणी डक्ट उघडे ठेवण्यात आले असून त्यात वाहनचालक पडू नयेत यासाठी त्याला संरक्षक भिंत उभारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. मात्र अशा पद्धतीने राज्य महामार्गाच्या मधोमध तीन-तीन फुटांच्या भिंती उभारणे वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असून यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या भिंतींवर किमान फलक किंवा रेडियम लावावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, एमएमआरडीएच्या चुकीमुळे झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला सरकारी मदत मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली आहे. तसेच फलक न लावणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Improper construction on state highway in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.