मुर्धा, राई, मोर्वा खाडीतील बेकायदा बांधकामे तातडीने हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:40 PM2019-06-08T23:40:45+5:302019-06-08T23:40:50+5:30

सांडपाण्याचे नाले बंद करा, ग्रामस्थ, शिलोत्री संघाचा। महपालिकेला इशारा

Immediately delete illegal constructions of Mudhada, Rai, Morva Khadi | मुर्धा, राई, मोर्वा खाडीतील बेकायदा बांधकामे तातडीने हटवा

मुर्धा, राई, मोर्वा खाडीतील बेकायदा बांधकामे तातडीने हटवा

Next

भार्इंदर : भार्इंदरच्या मुर्धा, राई व मोर्वासह अन्य खाड्यांमधील फोफावलेले बेकायदा भराव व बांधकामे तातडीने हटवा. कचरा व सांडपाणी बंद करा, अन्यथा बेकायदा सांडपाण्याचे नाले बंद करू, असा इशारा मुर्धा, राई व मोर्वा गावांतील ग्रामस्थ, शेतकरी व शिलोत्री संघाने महापालिकेला दिला आहे.

‘लोकमत’ने मुर्धा खाडीमाफियांनी भराव व बांधकामे करून कशी नामशेष करायला घेतली आहे, याचे वास्तव मांडले होते. त्यात महापालिका, लोकप्रतिनिधी व माफियांचे असलेले संगनमत तसेच खाडीत बेकायदा सोडलेले मलमूत्र व सांडपाणी, टाकला जाणारा कचरा आदी गोष्टी चव्हाट्यावर आणल्या होत्या. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मीठउत्पादक शिलोत्री संघ, गावपंच मंडळ व ग्रामस्थांनी खाडीपाहणीचा कार्यक्रमच ठेवला. त्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधत त्यादिवशी मुर्धा, राई व मोर्वा खाड्यांची पाहणी करण्यात आली.
प्रभाग समिती सभापती विनोद म्हात्रे, माजी महापौर गीता जैन, प्रभाग अधिकारी गोविंद परब, स्वच्छता निरीक्षक चाळके, शिलोत्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष कुंदन भोईर, खजिनदार व मोरवा गावपंच मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव व मुर्धा गावपंच मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, उपसचिव प्रमोद भोईर, सल्लागार अलका देसाई, प्रशांत शाह, राई गावपंच मंडळ अध्यक्ष भगवान पाटील, आगरी एकताचे प्रशांत म्हात्रे, पाटील प्रवीण म्हात्रे, द्वारकानाथ पाटील, मुरलीधर पाटील, स्वप्नील भोईर आदी सहभागी झाले होते.
भराव करून कच्ची व पक्की बांधकामे केलेली आढळली. या बांधकामांना पालिकेने करआकारणी करण्याबरोबरच पाणीपुरवठा, वीजजोडणी, पदपथ आदी सर्व सुविधा दिल्याचे दिसले. बहुतांशी खोल्यांमध्ये भाडेकरूच राहत असल्याचा तसेच चक्क कारखाने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
आहे.

अडवणूक खपवून घेणार नाही!
पावसाळा आला की, पालिकेला खाडीसफाईची जाग येते. सफाईचा दिखावा केला जातो. पुन्हा वर्षभर पाहिले जात नाही. आतापर्यंत शिलोत्री व ग्रामस्थांची चालवलेली अडवणूक यापुढे खपवून घेणार नाही. पालिकेने तातडीने खाडीपात्र व परिसरातील भराव-बांधकामे काढून घ्यावीत. अन्यथा, नाले बंद करून खाडीत बेकायदा पाणी सोडायचे बंद पाडू, असा इशारा अशोक पाटील यांनी दिला आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Immediately delete illegal constructions of Mudhada, Rai, Morva Khadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे