राजकारणी नाचले तरच नाट्यसंमेलन यशस्वी होईल - अशोक समेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 05:53 AM2019-11-15T05:53:56+5:302019-11-15T05:53:59+5:30

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले.

If the politicians dance, then the drama will be a success - Ashok Samael | राजकारणी नाचले तरच नाट्यसंमेलन यशस्वी होईल - अशोक समेळ

राजकारणी नाचले तरच नाट्यसंमेलन यशस्वी होईल - अशोक समेळ

Next

प्रज्ञा म्हात्रे 
ठाणे : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले. नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर राजकारणी नाचले तरच तुमचे संमेलन यशस्वी होणार आहे का, असा सवाल करतानाच सरकारी मदतीखेरीज नाट्य परिषदेला संमेलन करता येत नसेल, तर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी समेळ यांनी केली.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने नाट्यसंमेलन पुढे का ढकलायचे, असा सवाल समेळ यांनी केला तर उद्या पाच वर्षे कोणतेही सरकार आले नाही आणि अशीच अस्थिर परिस्थिती राहिली, राष्ट्रपती राजवट सुरू राहिली तर पाच वर्षे कोणतेही संमेलन घेणार नाहीत का? असा सवाल बागवे यांनी केला.
ठाण्यात गुरुवारी गंधार गौरव सोहळा पार पडला. त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा निषेधाचा सूर व्यक्त केला. समेळ म्हणाले की, नाट्य परिषदेने नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे, असे अलीकडेच जाहीर केले. अस्थिर राजकारणामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचे कारण काय? नाट्यसंमेलन मराठी प्रेक्षकांसाठी आहे. तेथे राजकारण कशाला यायला हवे. नाट्यसंमेलनासाठी मराठी नाट्यरसिकांकडे देणगी मागितल्यास कोट्यवधी रुपये जमा होतील. नाट्यसंमेलनाकरिता सरकारकडून पैसे मागण्याची गरज नाही. सरकारच्या पैशांखेरीज नाट्यसंमेलन करून दाखवावे. ती ताकद नसेल तर राजीनामा द्यावा आणि गप्प बसावे. राजकारण्यांनी पैसा दिला किंवा ते स्टेजवर येऊन नाचले तरच तुमचे नाट्यसंमेलन होणार आहे का? नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याच्या भूमिकेचा मी निषेध करतो, असे समेळ म्हणाले. आजही मराठी रसिकांना आवाहन करा, ते त्यांच्या खिशातून लाखो रुपये काढून देतील आणि तुमचे नाट्यसंमेलन करतील, असेही ते म्हणाले.
बागवे म्हणाले की, आमच्या सूत्रांकडून कळले आहे की, नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. साहित्यसंमेलन आता जानेवारीमध्ये आहे ते पण पुढे ढकलणार का? एवढे मोठे महानाट्य महाराष्ट्राच्या रंगभूमीवर चालले असल्यामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलले आहे का? सरकार देत असलेल्या देणगीमूल्यावर सर्व संमेलने होत असतात. मग आपण सगळे कलाकार, लेखक इतके लाचार झालो आहोत, की राजकीय अस्थिरतेमुळे आपली संमेलने, आपले सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलावे? आता या सगळ्या कलाकारांनीच या राजकारण्यांना कुठेतरी ढकलावे. सामान्य रसिकांना संमेलने व्हावी आणि त्यांच्या प्रगल्भतेत वाढ व्हावी, असे वाटत असते. नाट्यसंमेलन नावाची एवढी मोठी गोष्ट राजकीय अस्थिरतेमुळे पुढे ढकलत असतील, तर आम्ही आमची नाराजी प्रकट करणार.
संमेलन म्हणजे सर्वजण एकत्र येणे. राजकीय लोक एकत्र येत नाहीत. पण कलाकार एकत्र येतात. नाट्यसंमेलन रसिकांच्या देणगीतून होऊ शकते. एका सभागृहात साधेपणाने संमेलन घेता येईल. कोणत्याही कलाकाराला मानधन द्यायचे नाही. जेवणाचे डबे आणायचे असतील, त्याला आमची हरकत नाही. अशी साधेपणाने संमेलने होऊ शकतात, हे लोकांना दाखवून देण्याची गरज आहे, असे बागवे म्हणाले.
संमेलनाच्या मंचावर राजकीय नेते कशाला पाहिजेत. कुठल्याही संमेलनाच्या व्यासपीठावर स्वागताध्यक्ष राजकीय नेता हवा असतो, कारण तो पैसे देतो, त्याचा कलेशी काही संबंध नसतो. त्याचा ‘न कलेशी’ संबंध असतो. त्यामुळे नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे वाटते की, आपण आपली कला राजकारण्यांवर सोपवू नये. या राजकारण्यांना आपण सांगितले पाहिजे, कलेतून कसे एकत्र यावे. संमेलन कसे करावे आणि रसिकांना आनंद कसा द्यावा. नाट्यसंमेलन पुढे ढकलले याचा आंतरिक निषेध करतोय, असेही बागवे म्हणाले.
>'महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्वस्थ करणारी'
सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती एक कलाकार म्हणून अस्वस्थ करणारी आहे. जनतेने तुम्हाला कौल दिला होता. कुणी राज्य करावे व कुणी विरोधात बसावे, हे स्पष्ट निर्देशित केले होते. आपणाला जनतेसाठी काम करायचे की वैयक्तिक हिताकरिता काम करायचे, याचा विचार राजकारण्यांनी करावा. मात्र सारेच पक्ष आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मला मान्य नाही. आजची राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. -अशोक समेळ

Web Title: If the politicians dance, then the drama will be a success - Ashok Samael

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.