- कुमार बडदेमुंब्रा : कुणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने उम्मीद फाउंडेशनने सुरू केलेल्या उम्मीद फूड हाऊसमध्ये दररोज ४५० ते ५०० जणांना फक्त पाच रुपयांमध्ये भरपेट जेवण देण्यात येत आहे. यामुळे अल्पउत्पन असलेल्या तसेच बेरोजगार असलेल्यांची अल्प पैशात क्षुधाशांती होत आहे.गेल्यावर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ठिकठिकाणी सामाजिक संस्था तसेच काही राजकीय पक्षांनी कम्युनिटी किचन सुरू केले होते. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर त्यातील बहुतांशी बंद झाले; पण कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या व बेरोजगार झालेल्यांसमोर पोटाची खळगी कशी भरायची, असा यक्षप्रश्न समोर ठाकला होता. त्यामुळे ते ठिकठिकाणी अन्नाच्या शोधात फिरत असल्याचे उम्मीदचे अध्यक्ष परवेझ फरीद यांच्या निर्दशनास आले. अशांसाठी अल्प पैशात किमान एकवेळचे जेवण मिळावे यासाठी परवेझ यांनी सुरू केलेला हा उपक्रम सात महिन्यांपासून सुरू आहे. सध्या रशीद कम्पाउंड भागातील चर्णीपाडा येथून सुरू होत असलेला हा उपक्रम पहिले पाच महिने अमृतनगर येथून सुरू होता. या उपक्रमात पाच रुपयांत दोन ते तीनजणांना पुरेल एवढे अन्न संध्याकाळी देण्यात येते.दरदिवशी बदलला जाताे जेवणातील मेन्यू, नागरिकांना कार्डचे वाटपदरदिवशी मेन्यू बदली केला जातो. मेन्यूमध्ये भात, डाळ वा भाजी, बिर्याणी, पुलाव आदींचा समावेश असतो. जेवण घेण्यासाठी घरून डबा आणावा लागतो. ते घेण्यास येणाऱ्यांसाठी श्रेणीनुसार वेगवेगळ्या रंगाचे कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसामान्यांना हिरव्या रंगाचे, विधवा महिलांना गुलाबी रंगाचे तसेच दिव्यांग आणि वृद्धांना निळ्या रंगाचे कार्ड देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी अनेक सामाजिक संस्था मदत करत असल्याची माहिती परवेझ यांनी ‘लोकमत’ला दिली.
भुकेल्यांना मुंब्य्रात मिळते पाच रुपयांत भरपेट जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:17 IST