अजित मांडके / ठाणे केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपाकडून उमेदवारी मिळावी, याकरिता काही प्रभागांमध्ये १५ ते १८ इच्छुक मुलाखतीस येऊ लागल्याने या इच्छुकांमधील स्थानिकांना प्राधान्य देण्याचे भाजपा नेत्यांनी ठरवले आहे. ‘किसमे है कितना दम’ हे आजमावून पाहण्याकरिता या इच्छुकांना प्रभागात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास सांगितले जात असून ज्याच्या मेळाव्याला स्थानिकांची सर्वाधिक गर्दी असेल, त्याला उमेदवारी देण्याचे धोरण अमलात आणले जाणार आहे.ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाला उपऱ्या उमेदवारांवर अवलंबून राहावे लागेल, असेच काहीसे चित्र आजही आहे. परंतु, असे असले तरी आता ज्या प्रभागांमध्ये इच्छुकांत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे, तेथे उमेदवार स्थानिक असला पाहिजे, असा आग्रह भाजपाने धरला आहे. बाहेरील उमेदवार दिला तर लोक नाराज होतात व त्याचा फटका बसतो.जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. चार वॉर्डांचा एक पॅनल या पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे या पद्धतीचा सर्वाधिक फटका मनसे आणि काँग्रेसला बसणार असून त्याखालोखाल भाजपाला त्रास होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतर पक्षांतील काही नगरसेवकांच्या हाती कमळ देऊन आपली ताकद वाढवण्याच्या जोरदार हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे पक्षातील इच्छुकांमध्येदेखील चलबिचल सुरू झाली आहे. उमेदवार अन्य पक्षांतून आला तरी त्याला ज्या प्रभागातून उमेदवारी दिली जाईल, तेथील तो स्थानिक असलाच पाहिजे, असा आग्रह आहे. खोपट येथील भाजपा कार्यालयात काही दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. मुलाखतीत प्रभागातील समस्या, लोकसंख्या, विविध जाती-धर्मांच्या लोकांचे प्रभागातील प्रमाण याचे इच्छुकांना किती ज्ञान आहे, याची चाचपणी केली जात आहे.
किसमें कितना है दम
By admin | Updated: November 15, 2016 04:38 IST