प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : पैशांच्या हव्यासापोटी मुलांचे अपहरण केल्याच्या घटना कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नवीन नाहीत. २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कैवल्य भोईर या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरणाच्या प्रकाराने काळजाचा ठोका चुकविला; मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासांत त्याची सुखरूप सुटका करत आरोपींना बेड्या ठोकल्या. यात शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षावाल्या काकानेच अपहरण केल्याने विश्वास ठेवायचा कोणावर? हा सवाल उपस्थित झाला आहे.
२८ मार्चला पूर्वेकडील रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील महेश भोईर यांच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या कैवल्यचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी दोन कोटींची खंडणी मागितली होती. ही माहिती मिळताच तपासकामी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी संपत फडोळ, महेश राळेभात, कलगोंडा पाटील, अभिजित पाटील अधिकाऱ्यांची पथके नेमली. कैवल्य सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी रिक्षातून निघाला होता. सकाळी रिक्षाचालक वीरेन पाटीलच्या मोबाइलवरून कैवल्यचे वडील महेश यांना व्हॉट्सॲप कॉल आला. अनोळखी व्यक्तीने संवाद साधत तुमच्या मुलाचे रिक्षा चालकासह अपहरण केले आहे. २ कोटी रुपये द्यावे लागतील, पोलिसांना कळविल्यास दोघांना मारण्याची धमकी दिली होती.
वाढदिवसाच्या पार्टीत शिजला कटकैवल्यचे वडील महेश यांना एका जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपये मिळाले होते. याची माहिती वीरेन आणि संकेत यांना होती. त्यातूनच कोनगावात राहणाऱ्या विजय देवडेकर याच्या २७ मार्चच्या वाढदिवसाच्या पार्टीत अपहरणाचा कट रचला. अपहरण करून दोन कोटी मिळाल्यावर ते आपापसात वाटून घेतले जाणार होते. दरम्यान, या गुन्ह्यात सात आरोपींना अटक केली. यातील काही जण अल्पवयीन आहेत.
संशय बळावला, ठोकल्या बेड्याकैवल्यला शाळेत ने-आण वीरेन आणि त्याचा भाऊ करायचा. वीरेनच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत वीरेन सोबत संकेत मढवी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वीरेन आणि संकेतचे मोबाइल ट्रेस केले असता वीरेन शहापूरच्या दिशेने गेला तर संकेतचे कनेक्शन द्वारलीला सापडले. संकेतला ताब्यात घेत चौकशी केली असता वीरेन याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला आणि त्याच्या साथीने अपहरणाचा कट रचल्याचे उघड झाले आणि वीरेनलादेखील बेड्या ठोकत पोलिसांनी कैवल्यची सुटका केली.
डोंबिवलीतील अपहरणाच्या घटना २५ जुलै २००९ : यश शहा या ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केली होती. त्याचा मृतदेह २७ जुलैला बदलापूरमधील एका गावात सापडला होता. २५ ऑक्टोबर २००९ : दहा वर्षीय प्रिन्स जैनचे अपहरण झाले होते. परंतु त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. २ फेब्रुवारी २०१० : डोंबिवलीतील तुषार सोनी या दहा वर्षीय मुलाची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केली होती. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ३ फेब्रुवारीला आजदे गावात आढळला होता. ९ नोव्हेंबर २०२२ : रुद्रा झा (१२) चे दीड कोटीसाठी अपहरण झाले होते. पोलिसांनी ७२ तासांच्या तपासात त्याची सुटका करत ५ आरोपींना बेड्या ठोकल्या.