आरक्षणबदलासाठी अंबरनाथमध्ये घोडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:00 AM2020-02-15T00:00:48+5:302020-02-15T00:00:53+5:30

पालिका निवडणूक : इच्छुकांकडे केली जातेय लाखोंची मागणी

Horse market in Ambarnath for reservation | आरक्षणबदलासाठी अंबरनाथमध्ये घोडेबाजार

आरक्षणबदलासाठी अंबरनाथमध्ये घोडेबाजार

Next

पंकज पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : निवडणुकीची आरक्षण सोडत ही १८ फेब्रुवारीला पालिका कार्यालयात होणार आहे. मात्र, त्याआधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची गणिते तयार करून त्या अनुषंगाने काही नेतेच घोडेबाजार करत आहेत. आरक्षण पडणार नसले तरी त्या प्रभागावर आरक्षण पडणार, असे भासवत आरक्षण बदलून देतो, असे सांगून १० ते १५ लाखांची मागणी केली जात आहे. तर, काही राजकीय नेते निवडणूक आयोगाकडे आपली खूप ओळख असल्याचे दाखवत इच्छुकांकडे पैशांची मागणी करत आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांचे आरक्षण हे प्रभागातील लोकसंख्येच्या गणितावर अवलंबून आहे. ज्या प्रभागात एससी, एसटी यांची लोकसंख्या जास्त आहे, त्या प्रभागात आरक्षणही चक्राकार पद्धतीने पाडण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून आरक्षण बदलण्याचे काम सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काही नेते या आरक्षणाच्या गणितावर पैशांचा बाजार मांडत आहे.
कोणत्या प्रभागावर कोणते आरक्षण पडणार, याचा आकडेवारीनुसार अंदाज काढणे सोपे झाले आहे. गुरुवारी दुपारी एसीसी आणि एसटीची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली. त्यातच जनगणनेतील ब्लॉक आणि त्याची लोकसंख्याही वर्ग केलेली आहे. त्या ब्लॉकनुसार आरक्षण बदलून देतो, असे सांगून पैशांची मागणी केली जात आहे.
मुळात अनेक इच्छुक उमेदवारांना आकडेवारीची गणितेच माहीत नसल्याने तेही भीतीपोटी या आमिषाला बळी पडत आहेत. आपली पाच वर्षांची मेहनत वाया जाण्यापेक्षा काही जुगाड होतो का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक हे पैसे खाऊ राजकारण्यांचे बळी पडले आहेत. काही कंत्राटदारही त्याच नीतीचा अवलंब करून पैसे उकळण्याचे काम करत आहेत.
याआधी निवडणूक आयोग जे आरक्षण देणार ते मान्य करून पुढे चालत होते. मात्र, दोन दिवसांत आरक्षणबदलाची आणि आरक्षणाचे ‘सेटिंग’ होते का याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार चिंतेत आहे.
आरक्षणाची हेराफेरी झाल्यास काही अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मांडलेल्या बाजाराचे सर्व खापर आता अधिकाºयांवर फोडले जाण्याची शक्यता आहे.
बदलापूरमध्ये अद्याप शांतता
बदलापूर : आरक्षणात बदल करण्यासंदर्भातील चर्चा ज्या पद्धतीने अंबरनाथमध्ये सुरू आहे, तशी कोणतीही चर्चा बदलापूरमध्ये अद्याप तरी रंगात आलेली नाही. बदलापुरातील राजकीय नेत्यांनी मानसिकता तयार ठेवल्याने जे आरक्षण पडेल, ते मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पैशांच्या जोरावर आरक्षण बदलण्याचा प्रयत्न येथे होताना दिसत नाही.

च्दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत १८ फेब्रुवारीला काढली जाणार होती. मात्र ही सोडत पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने तोंडी आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र ही पुढे ढकलण्यात आलेली तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. निवडणूक आयोगाचे सातत्याने बदलणारे आदेश हे संभ्रम निर्माण करणारे ठरत आहेत. तर दुसरीकडे वेळापत्रक आणि आदेश सातत्याने बदलत गेल्याने आयोगावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Web Title: Horse market in Ambarnath for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.