पोलिसांना  ‘कोरोनायोद्धा पदक’ मिळवून देणार - हेमंत नगराळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 07:39 AM2021-01-30T07:39:54+5:302021-01-30T07:40:10+5:30

७४ पोलीस पाल्यांना दिले नियुक्तीचे पत्र

Hemant Nagarale to get 'Coronado Medal' for police | पोलिसांना  ‘कोरोनायोद्धा पदक’ मिळवून देणार - हेमंत नगराळे

पोलिसांना  ‘कोरोनायोद्धा पदक’ मिळवून देणार - हेमंत नगराळे

Next

ठाणे: आपल्या कुटुंबापासून दूर राहून कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात धीरोदत्त आपले कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्रातील पोलिसांना ‘कोरोनायोद्धा विशेष पदक’ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. अशा बाबीसाठी ते नकार देणार नाहीत, याची खात्री आहे. नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य द्या, असा सल्ला राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात शुक्रवारी दिला.

कोरोनामुळे शहीद झालेल्या तसेच गेल्या दोन वर्षांत पोलीस सेवेत असताना मृत्यू पावलेल्या ७४ पोलीस पाल्यांना पोलीस सेवेत नियुक्तीचे पत्र देण्याचा विशेष कार्यक्रम ठाण्यातील साकेत येथील कवायत मैदानावर आयोजित केला होता. यावेळी नगराळे यांनी या विशेष पदकाबाबतचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले की, इतर राज्यांमध्येही कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोना वॉरियर्स म्हणून पदक देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील पोलिसांनाही असेच पदक देण्याचा आपला मनोदय आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील पोलिसांना अशी सेवा पदके प्रदान केली जातील, असेही ते म्हणाले.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी या काळात मोठ्या संकटाशी सामना केला. स्थलांतरीत मजुरांना घरी पोहोचविण्यासून ते रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणणे अशी सर्वच कामे त्यांनी मोठ्या धीराने पार पाडली. असाच उपक्रम राज्यभर आयोजित केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. कोरोनातील १९ तसेच उर्वरित गेल्या दोन वर्षातील ५५ अशा ७४ पोलीस पाल्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात येत आहे. याद्वारे त्यांना एकप्रकारे नवीन पंख दिले जात असून, प्रामाणिकपणे पोलिसांतील नोकरी करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी 
या नवीन पोलिसांना दिला. 

तक्रारदारांना प्राधान्य द्या!
या कार्यक्रमानंतर पोलीस महासंचालक नगराळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हे आढावा बैठक घेतली. यावेळी नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य द्या. त्याचे निरसन होईपर्यंत पाठपुरावा करा. गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी मकोका आणि एमपीडीएसारख्या कायद्यांचा प्रभावीपणे वापर करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि सहआयुक्त सुरेश मेकला यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यावेळी उपस्थित होते.

Web Title: Hemant Nagarale to get 'Coronado Medal' for police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.