मीरा रोड : देशातील प्रत्येक तीन व्यक्तींमागे एक मधुमेहाने त्रस्त आहे. भारतातील याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगतानाच आगामी काळात अनेकजण या आजारामुळे बाधित होऊ शकतात, अशी भीती लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ हृदयशल्यविशारद डॉ. पवन कुमार यांनी व्यक्त केली. तसेच मधुमेही व्यक्तींना हृदयविकाराचा जास्त धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन असतो. त्यानिमित्त मीरा रोडच्या वोक्हार्ट रु ग्णालयातर्फे मुंबई महापालिकेच्या दोन हजार कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी करण्यात आली. त्या वेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. प्रोटीन्स आणि शरीरासाठी पोषक मूल्यांचा अभाव असूनही सल्फरडायआॅक्साइड वायू, फॉर्मालीन, रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रि यांतून तयार केलेली पांढरीशुभ्र दाणेदार साखर आवडत असली तरी ती शरीराला त्रासदायक असते. प्रोटीन्स, जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, क्षार यांचा अभाव साखरेमध्ये असतो. यामध्ये फक्त कार्बोहायड्रेड्स अधिक प्रमाणात असतात आणि त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरीज) अधिक प्रमाणात मिळतो. त्यामुळेच अतिचहा, अतिसाखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, अतिरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात. मधुमेह हा सर्वांना माहीत असणारा आजार असला, तरी योग्य माहिती नसल्यामुळे या आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत. शरीरात वाढलेल्या साखरेचे दुष्परिणाम पचनसंस्था, रक्तवहसंस्था, मूत्रवहसंस्था, त्वचा, श्वसनसंस्था व डोळ्यांवर दिसून येतात. आजच्या तरु ण पिढीत शरीराला काय गरजेचे आहे, याचे भान उरले नसून मधुमेहाचे निदान फार उशिरा होते. मधुमेहाचे निदान झाले तरी चारपाच वर्षे आधी ती व्यक्ती मधुमेहाच्या पूर्वावस्थेत असते. अशा अवस्थेत जर योग्य वैद्यकीय उपचार व जीवनशैली निवडली, तर शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी होऊ शकतात, असे वोक्हार्टचे फिजिशियन व क्रि टीकल केअरतज्ज्ञ डॉ. विनयकुमार अग्रवाल म्हणाले. साखर पचवण्यासाठी स्वादुपिंडाला (किडनीला) फार मेहनत घ्यावी लागते. या कामासाठी स्वादुपिंडातील इन्सुलीन फार खर्च होते. त्यामुळे इन्सुलीनची कमतरता निर्माण होऊन मधुमेह हा आजार निर्माण होतो. याकरिता, साखरेचा वापर अगदी गरजेपुरताच करावा, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी )
मधुमेही व्यक्तीला हृदयविकाराचा धोका
By admin | Updated: November 14, 2016 04:13 IST