Handicap, KDMC proceedings in Nandivali | नांदिवलीत इमारतीवर हातोडा, केडीएमसीची कारवाई
नांदिवलीत इमारतीवर हातोडा, केडीएमसीची कारवाई

डोंबिवली: केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला. विकास आराखड्यातील नियोजित रस्त्याच्या जागेवरच ही इमारत बांधण्यात आली होती. प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्यातील (डीपी) नियोजित रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या या इमारतीवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, इमारतीतील रहिवासी एकत्र येऊ न त्यांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

विकासक आणि जमीनमालक बंटी बाळाराम म्हात्रे यांनी या इमारत बांधली होती. ही इमारत बेकायदा असल्यामुळे आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी आणि उपायुक्त सुनील जोशी यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली. गायकवाड यांनी इमारतमालकाला महाराष्ट्र महापालिका अधिनियमांनुसार नोटीस बजावून ही इमारत रिकामी करण्याचे पत्र रहिवाशांना दिले होते, असे महापालिकेने म्हटले आहे. बोडके, उपायुक्त, सुनील जोशी, सहायक संचालक नगररचनाकार मारुती राठोड हे उपस्थित होते.

कारवाईत ‘आय’ प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे, ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, ‘फ’ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव सहभागी झाले होते. पोलिसांच्या बंदोबस्तासह तीन जेसीबी, दोन पोकलेनद्वारे ही कारवाई झाली.

जेसीबी, पोकलेन रोखण्याचा प्रयत्न

रहिवासी राहत असलेल्या विंगवर कारवाई होताच रहिवाशांनी एकत्र येऊ न पोकलेन आणि जेसीबी रोखून तीव्र विरोध केला. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; तोपर्यंत पथकाने डीपी रस्त्याच्या आड येणारे बांधकाम व इमारतीच्या एका विंगचे बांधकाम तोडले होते. या इमारतीत दोन विंग मिळून ५० हून अधिक नागरिक राहत असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईसाठी मानपाडा पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

सोशल मीडियावरून टीका : बेकायदा इमारतीवर झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात आली. बेकायदा इमारती उभ्या राहतात, तेव्हाच कारवाई का होत नाही? रहिवासी राहायला येईपर्यंत महापालिका प्रशासन झोपले होते का? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच ही इमारत ज्या प्रभागक्षेत्र अधिकाºयांच्या काळात बांधण्यात आली, ते अधिकारी, अतिक्रमण हटाव पथकातील संबंधित कर्मचाºयांवर काय कारवाई होणार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. पारदर्शी कारभाराचे गुण गाणारे डोंबिवलीकर त्याचीही वाट बघतील, अशी टीकाही करण्यात आली.


Web Title: Handicap, KDMC proceedings in Nandivali
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.