उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं.-५, वाल्मीकीनगर येथील बेकायदा बांधकामे बुधवारी जमीनदोस्त केली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केली असून इतर प्रभागांत बेकायदा बांधकामाला चक्क सहायक आयुक्तासह पथक संरक्षण देत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.महापालिका निवडणुकीदरम्यान बेकायदा बांधकामे झाली. त्यावर, कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष मनुउद्दीन शेख यांनी दोन महिन्यांत उभी राहिलेल्या सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाईची मागणी आयुक्तांकडे लावून धरली. संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली.कॅम्प नं.-५ येथील वाल्मीकीनगर येथे बेकायदा बांधकामे उभी राहिल्याची माहिती शिंपी यांना मिळताच त्यांनी दुपारी पथकासह जाऊन बांधकामे जमीनदोस्त केली. तीन दिवसांपूर्वी परिसरातील सह्याद्रीनगर येथे बांधकामाच्या वादातून पुतण्याने काकाची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला होता. नागरिकांनी अशा बांधकामांचे फोटो व्हॉट्सअॅपवर विभागाच्या नावासह टाकल्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
बेकायदा बांधकामांवर अखेर पडला हातोडा
By admin | Updated: March 16, 2017 02:56 IST