डोंबिवली : पाच कोटींचा निधी गोळा करण्यासाठी धडपडणाऱ्या आयोजकांना आतापर्यंत अवघा दोन कोटींचा निधी गोळा करण्यात यश आल्याने यंदाच्या साहित्य संमेलनावर काटकसरीचे मोठे सावट असेल, अशी कबुली सोमवारी आयोजकांनी दिली. त्यामुळे आमदार निधी आणि नगरसेवक निधीवरच तूर्त आयोजकांची भिस्त आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाला साकडे घालण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्य मंडपाचा आकार कमी करून उपस्थितांची जागा तीन हजारांनी घटविण्यात येणार आहे.संमेलनाचे आयोजन आगरी समाजाकडे असल्याने यंदा भोजनात सामिष पदार्थांचा समावेश असेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र भोजन शाकाहारी असेल, असे सांगत त्यासाठी डोंबिवली-कल्याणमधील व्यापारी धान्य, तेल, मसाले पुरविणार आहेत आणि त्यामुळे भोजनावळीवरील ३० लाखांचा खर्च वाचेल, असा तपशील आयोजकांनी पुरविला.स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनाला ठाणे, मीरा-भाईंदर आणि अंबरनाथ पालिकेने निधी देण्याचे कबूल केले होेते. त्यांच्या निधी वितरणात आचारसंहितेचा अडसर आल्याने त्यांच्याकडून मिळणारा निधी अडकून पडला. नगरसेवकांकडूनही प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित होते. तो मिळावा म्हणून निवडणूक आयोगाकडे विनंती पत्र पाठविले जाणार आहे. संमेलनासाठी एक कोटी ५८ लाखांचा निधी जमा झाला आहे. अजून ६० लाखांचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री चव्हाण यांनी दिले आहे. संमेलनासाठी विद्यार्थ्यांकडून दहा रुपये व शिक्षकांकडून स्वागत शुल्क घेण्याचा प्रस्ताव महामंडळाकडून मांडण्यात आला होता. त्यावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.भोजनासाठी कल्याण व डोंबिवलीतील काही किराणा व भाजीपाला व्यापाऱ्यांनी अन्नधान्य, तेल, मसाला देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे संमेलनाच्या भोजनावळीवरील जवळपास २५ ते ३० लाखांचा खर्च वाचणार आहे. भोजनाचा बेत साधा आणि शाकाहारी असेल. त्याचा मेन्यू अद्याप ठरलेला नाही, असे वझे म्हणाले. (प्रतिनिधी)
खर्च निम्म्यावर, उपस्थितांची जागा घटवली
By admin | Updated: January 24, 2017 05:50 IST