वादात अडकलाय गावदेवी पार्किंगचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:24 AM2019-11-11T01:24:04+5:302019-11-11T01:24:08+5:30

वाढत्या शहरीकरणासोबत रस्ते रुंद झाले, सोबतच वाहनांची संख्याही वाढली.

Gawad Devi gets involved in controversy | वादात अडकलाय गावदेवी पार्किंगचा प्रश्न

वादात अडकलाय गावदेवी पार्किंगचा प्रश्न

Next

- जितेंद्र कालेकर,
ठाणे- वाढत्या शहरीकरणासोबत रस्ते रुंद झाले, सोबतच वाहनांची संख्याही वाढली. मात्र वाहने उभी करण्यासाठी संपूर्ण ठाणे शहरात कुठेही नियोजन नाही. घोडबंदरपासून ठाणे रेल्वेस्थानकापर्यंत कार किंवा मोटारसायकल कुठेही उभी केली तरी, चोरी जाण्याची किंवा वाहतूक शाखेचे पोलीस उचलून नेण्याची धास्ती सामान्य वाहनधारकांना असते. अगदी दिल्लीतही अशीच परिस्थिती असल्यामुळे तिथेही पार्किंगच्या मुद्यावरून पोलीस आणि वकील मंडळी आपापसात भिडली. ठाणे शहरातील बाजारपेठेपासून जवळच असलेल्या गावदेवी मैदानात स्मार्ट सिटीअंतर्गत दुचाकी आणि कारसाठी भुयारी पार्किंग उभारण्यात येणार आहे. याची सुरुवातही झाली असली तरी, या कामाला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. काही स्थानिकांनी पार्किंगचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटणार असल्यामुळे स्वागत केले आहे. यात मैदानाचा काही भाग जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या पार्किंगला आक्षेप घेतला आहे. तर, पार्किंग दिल्यामुळे या परिसरात आणखी वाहनांची संख्या वाढून पुन्हा कोंडीत भर पडेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. एकूणच गावदेवी मैदानात होणारा पार्किंगचा हा प्रकल्प वादाच्या कोंडीत अडकल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात ‘आॅन द स्पॉट’ घेतलेला हा आढावा.
स ध्या घोडबंदर किंवा ठाणे शहरातील कोणताही रहिवासी ठाण्यातील जांभळीनाका येथील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आला किंवा ठाणे रेल्वेस्थानकाकडे स्वत:च्या वाहनाने आल्यास प्रत्येकालाच वाहन कुठे उभे करायचे, हा मोठा प्रश्न असतो. ते उभे केल्यानंतर एक तर चोरीची किंवा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून टोइंग करून नेण्याची भीती असते. जी पार्किंग उपलब्ध आहे, ती गोखले रोड किंवा इतर ठिकाणी अगदी त्रोटक प्रमाणात असून, त्यातही चारचाकी वाहनांसाठी तर जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे आहे त्या जागेत कुठेही वाहने उभी राहिली, तरी आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी अपुरे पडतात. त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडते. यासाठीच ठाणे महापालिकेने गावदेवी मैदानामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांंतर्गत भुयारी वाहनतळाच्या कामाला सुरुवात केली आहे. सुमारे २३ कोटींच्या खर्चातून येत्या १८ महिन्यांच्या कालावधीमध्ये हा वाहनतळाचा प्रकल्प उभारला जाणार आहे.
ठाणे महापालिकेने वाहनतळाच्या कामाचा ठेका एका कंपनीला दिल्याची माहिती मैदानाचे खोदकाम सुरू झाल्यानंतर पुढे आली. त्यानंतर येथील अनेक स्थानिक रहिवाशांनी, पर्यावरणवाद्यांनी आणि काही तज्ज्ञ मंडळींनीही महापालिकेकडे आक्षेप नोंदविले. यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते तथा स्थानिक रहिवासी डॉ. महेश बेडेकर यांनी तर न्यायालयात याविरुद्ध याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयातही हा विषय प्रलंबित आहे. मुंबई महापालिकेत वाढत्या नागरिकीकरणासाठी कोणत्या सुधारणा देणे आवश्यक आहे, यासाठी सल्लागार असलेल्या ठाण्यातील रहिवासी सुलक्षणा महाजन यांनीही हे मैदान वाचविण्यासाठी मोहीम उघडली आहे. नौपाडा विभागात येणाऱ्या-जाणाºया सर्व लोकांसाठी, भाजीबाजारातील विक्रेते आणि खरेदीदार तसेच पादचारी मुले, महिला आणि वृद्धांसाठी हे वाहनतळ घातक आणि अडचणी निर्माण करणारे असल्याचा आक्षेप महाजन यांनी घेतला आहे.
या मोठ्या खर्चिक प्रकल्पामुळे या विभागातील वाहनकोंडी कमी होणार नाही. उलट, ती वाढेल. या रस्त्यावरून जाणाºया बस, रिक्षा प्रवाशांचेही अतोनात हाल होणार आहेत. शिवाय, बांधकामाच्या खोदाई आणि नंतरच्या काळात या विभागात मोटारींची प्रचंड कोंडी होणार आहे. खोल खड्डा आणि बांधकाम हा आजूबाजूच्या इमारतींना, रहिवाशांना धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्यात पाणी साठून डास आणि रोगांचा, धूळ आणि प्रदूषणाचा धोका निर्माण होईल.
शिवाय, अंधाºया भुयारातील वाहनतळ अत्यंत असुरक्षित आणि संकटांना आमंत्रण देणारे ठरेल. अशा अनेक अडचणी असताना हा प्रकल्प नागरिकांसाठी फायद्याचा
ठरणारा नाही. म्हणूनच वाहनतळ नको.
मैदान ठेवावे आणि वाहनतळ रद्द करावे, अशी मागणीच महाजन
यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
>२५० वाहनांची समस्या सुटणार
गावदेवीचे मैदान हे ५,१०० चौरस मीटर असून ४,३१० चौरस मीटरच्या जागेत हे वाहनतळ उभारले जाणार आहे. वाहनांना या वाहनतळामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्याच्या मार्गासाठी मैदानाची सात टक्के म्हणजे साधारण २८० ते ३०० चौरस मीटर जागा जाणार आहे. यात मैदान जाणार नसल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. या प्रकल्पामुळे १३० चारचाकी आणि १२० वाहनांच्या पार्किंगची सोय याठिकाणी होणार आहे. त्यामुळे नौपाडा परिसरात रस्त्यांवर उभ्या राहणाºया वाहनांची गर्दी कमी होईल. या भागातील वाहनांची कोंडी कमी होण्यासाठीच हा प्रकल्प असल्याचे ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी सांगितले.याठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्किंग होणार असले तरी पार्किंगचा दर आणि त्याच्या व्यवस्थापनाच्या जबाबदारीबाबत निर्णय झालेला नाही. हे वाहनतळ झाल्यानंतर गोखले रोड, शिवाजी पथ, राममारुती रस्ता, गावदेवीच्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि बेडेकर हॉस्पिटलसमोरील गल्ली यांना जोडणाºया रस्त्यावर होणारी वाहनांची वर्दळ कमी होऊन कोंडीही कमी होईल. पर्यायाने प्रदूषणही कमी होईल.
- विकास ढोले, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, ठामपा

Web Title: Gawad Devi gets involved in controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.