जनशताब्दी एक्स्प्रेसच्या खाद्यपदार्थांत गब्बरसिंग टॅक्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:00 AM2017-11-10T01:00:42+5:302017-11-10T01:00:56+5:30

कोकण रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गाड्यांना विलंब होत असतानाच त्यातील खाद्यपदार्थांचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात असल्याचे उघड झाले आहे.

Gabbar Singh Taxes in Janshatabdi Express Food! | जनशताब्दी एक्स्प्रेसच्या खाद्यपदार्थांत गब्बरसिंग टॅक्स!

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या खाद्यपदार्थांत गब्बरसिंग टॅक्स!

Next

ठाणे : कोकण रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गाड्यांना विलंब होत असतानाच त्यातील खाद्यपदार्थांचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी जीएसटीचे कारण पुढे केले जात असल्याने प्रवासी आणि कंत्राटदाराच्या कर्मचाºयांत वाद झडत आहेत. मोठा गाजावाजा करत आणलेले मेन्यूकार्ड बाजूला ठेवत मोजके किंवा कंत्राटदाराच्या मर्जीतील पदार्थच जनशताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या वाट्याला येत असल्याचा अनुभवही गेल्या आठवड्यात प्रवाशांना आला. पण त्यावर ओम साई एन्टरप्राइजेस या कंत्राटदाराच्या प्रतिनिधींनी काहीही बोलण्यास नकार दिला.
गेल्या आठवड्यात जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये नाश्ता, तसेच जेवणासाठी जेव्हा प्रवाशांना अवघे दोन-तीन पर्याय देण्यात आले तेव्हा काही प्रवाशांनी मेन्यूकार्ड मागितले तेव्हा बराचकाळ ते देण्यातच आले नाही. ज्या वातानुकूलित डब्यातील प्रवाशांनी ही मागणी केली, तेथे काही काळ खानपान सेवेचे कर्मचारी फिरकलेच नाहीत. नंतर जेव्हा अन्य प्रवाशांनी आॅर्डर केलेले पदार्थ वाटण्यासाठी हिरव्या टी शर्टमधील कर्मचारी आले तेव्हा त्यांनी यादीत नसलेल्या उपमा, शिरा, मेदूवडे, कटलेट या पदार्थांसाठी ४० रूपयांपासून ६० रूपये घेतले. तेव्हा पुन्हा प्रवाशांनी दरपत्रक मागितले. पण ते मिळाले नाही. तेव्हा डब्यातील टीसीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर जेवणासाठी फक्त बिर्याणीचाच पर्याय देण्यात आला. त्यामुळे प्रवासी संतापले. त्यांनी पुन्हा मेन्यूकार्ड मागितले तेव्हा त्यावर ५३ पदार्थांची यादी होती. पण त्यातील पहिले पान गहाळ होते. फक्त २६ ते ५३ क्रमांकाच्या पदार्थांच्या यादीची झेरॉक्स दाखवण्यात आली. त्यात दाखवलेल्या किंमतींपेक्षा १० ते २० रूपये अधिक घेतल्याचे लगेचच उघड झाले आणि प्रवाशांचा ओम साईच्या कर्मचाºयांशी वाद सुरू झाला. तेव्हा जीएसटीमुळे दर वाढल्याचा दावा त्यांनी केला. जर या पदार्थांचे बिल दिले जात नसेल तर जीएसटी आकारण्याचा अधिकार काय, असा मुद्दा प्रवाशांनी उपस्थित करताच कर्मचारी निरूत्तर झाले. झेरॉक्स केलेल्या मेन्यूकार्डमध्ये जीएसटीसह किंमती नमूद केल्याचे लक्षात येताच पुन्हा वाद उफाळला आणि हा गब्बरसिंग टॅक्स (जीएसटी) मागे घ्या, असे आवाहन करत काही प्रवाशांनी सांबा, कालिया यांच्या नावाने संवादही सुरू केले. पण कर्मचाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वाद घालणाºया एक-दोन प्रवाशांना जादा घेतलेले दहा-वीस परत करण्यात आले. पण अन्य प्रवाशांना पैसे परत करण्यात आले नाहीत. नंतर टीसींनीही यात मध्यस्थी केली नाही किंवा वाद मिटवण्याचाही प्रयत्न केला नाही.

पदार्थ थंडगार
गाड्या विलंबाने धावत असल्या, तरी त्याची पूर्वकल्पना दिली जात नव्हती. त्यातही दादर, मडगाव, रत्नागिरी अशा स्थानकात पदार्थ तयार करण्याच्या वेळा पाळल्या जात असल्याने गारेगार-बेचव पदार्थ प्रवाशांच्या वाट्याला येत आहेत.

उपम्याच्या वड्या : दादरहून मडगावला जाणाºया गाडीत नाश्त्यासाठी उपमा, शिरा, पोहे, कटलेट, आॅम्लेट असे पर्याय होते. प्रत्यक्षात जेव्हा पाकिटबंद पदार्थ आले तेव्हा त्यातील उपमा, शिरा हे पदार्थ द्रवरूप अवस्थेत भरल्याचे लक्षात आले.
कारण त्याच्या वड्या पाडूनच ते खावे लागले. त्यातच उपमा, शिरा एकत्र होता. उपमा, मेदूवडा एकत्र होता. पोहेही चिवट-कडक झालेले होते. गरम असतानाच पॅक केल्याने आॅम्लेटला ओल लागली होती. कटलेट, आॅम्लेटसोबत दिलेल्या पावाच्या कडा कडक होत्या.
मडगावहून दादरला येताना जेवणासाठी दिलेल्या बिर्याणीत मीठ खूप कमी होते, तर त्यासोबत दिलेला रस्सा इतका तिखट होता की अनेकांना ठसका लागला. तर काहींनी तोंड होरपळल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आणून दिले. पण काहीही उपयोग झाला नाही.

Web Title: Gabbar Singh Taxes in Janshatabdi Express Food!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.