ठाणे : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ठाण्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असल्याची घोषणा केली असली, तरी आघाडीचे जागावाटप ८ जागांवर अडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक होऊनही काँग्रेसने त्या आठ जागांवरील आपला दावा सोडलेला नाही. जागावाटपाचा तिढा कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने २०१२ च्या वाटाघाटीच्या वेळी वेगवेगळ्या पदांबाबत व समित्यांवरील नियुक्त्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केल्याने वाटाघाटींना वेगळेच फाटे फुटण्याची व पर्यायाने आघाडीत विघ्न येण्याची भीती निर्माण झाली आहे.आठ जागांचा तिढा सोडवण्यासाठी सोमवारी ठाण्यात पुन्हा चर्चा झाली. काँग्रेसने मुंब्रा, गोकूळनगर, घोडबंदर, बाळकुम, वागळे आदी जागांवर आपला दावा ठाम असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. राष्ट्रवादीही या जागा सोडण्यास तयार नाही. राष्ट्रवादी आपल्याला वापरून घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. २०१२ च्या पालिका निवडणुकीत झालेल्या करारनाम्याचीही राष्ट्रवादीला आठवण करून दिली आहे. त्या वेळेस विरोधी पक्षनेतेपद, स्थायी समिती, प्रभाग समिती आदींसह इतर महत्त्वाच्या पदांसाठी करारनामा झाला होता. परंतु, यातील एकही शब्द राष्ट्रवादीने पाळला नाही. तसेच मागील निवडणुकीत राष्ट्रवादीमुळे काँग्रेसच्या आठ जागांवर बंडखोरी झाली, याचीही आठवण काँग्रेसने करून दिली आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास नसून आताही ते दगाफटका करू शकतात, असा दावाही काँग्रेसने केला आहे. (प्रतिनिधी)
आघाडीत आठ जागांचा तिढा कायम
By admin | Updated: January 24, 2017 05:44 IST