ठाणे : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे किडनी विकाराने त्रस्त असल्याने त्यांना बाळकुम येथील आकृती रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. त्यांच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.
गेले काही दिवस कांबळी यांना ताप येत असून डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे शनिवारी रात्री त्यांना आकृती रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या सर्व चाचण्या केल्या असून सीटी स्कॅन केला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कांबळी यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. विवेक द्विवेदी हे कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे व्हिडीओ कॉलद्वारे पत्नीशी बोलत असून, आपल्या कुटुंबाला आपल्या प्रकृतीसंबंधी माहिती देत आहेत.
डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘कांबळी यांच्यावर आम्ही मोफत उपचार करणार आहोत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये दोन दिवस उपचार होतील. त्यांना हृदयाचाही त्रास होत असून रक्तदाब आणि मधुमेहही वाढला आहे. तसेच, कांबळी यांना मेंदूमध्येही त्रास जाणवत आहे.’
काही दिवसांपूर्वी दादर शिवाजी पार्क येथे आचरेकर सरांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला कांबळी हे उपस्थित होते. माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हेही यावेळी हजर होते. त्यावेळी सचिन यांनी आपल्या बालपणीचा मित्र कांबळी यांच्या जवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. या प्रसंगाचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तेंडुलकर व कांबळी हे आचरेकर सरांचे शिष्य राहिले असून, दोघांनी एकाच वेळी शालेय क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर भारतीय संघाद्वारे नव-नवे विक्रम रचले.