खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:33 AM2020-07-30T00:33:46+5:302020-07-30T00:33:57+5:30

मनसेचा आरोप : ...अन्यथा दुकान सील करण्याची ठाणे महापालिकेची जबरदस्ती

Forced to test in a private lab | खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची सक्ती

खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची सक्ती

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट न केल्यास तुमची दुकाने सील करू, असे ठाणे महापालिकेने धमकावल्याचा आरोप चंदनवाडी परिसरातील दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. मनसेने बुधवारी हा मुद्दा उपस्थित करून, खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची महापालिकेकडून जाणारी जबरदस्ती म्हणजे ठाणेकरांची गळचेपी असल्याचा आरोपही केला आहे. मात्र, महापालिकेकडून अशी कोणतीही जबरदस्ती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या दुकानदारांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड टेस्ट करण्याची पत्रके वाटली. यात एका खाजगी लॅबचा उल्लेखदेखील केला आहे. कोविड टेस्ट केली नाही तर दुकाने सील करु, असे पालिकेच्या कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. याबाबत या दुकानदारांनी मनसेचे कोपरी पाचपाखडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याकडे धाव घेतली.
यावेळी त्यांनी सरकारी रुग्णालयांत या दुकानदारांची कोविड टेस्ट का होऊ शकत नाही, असा प्रश्न केला. खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी दोन हजार ८00 रुपये लागतील, असे महापालिकेच्या कर्मचाºयांनी या दुकानदारांना सांगितले.
त्यावर ठाणेकरांसाठी एक लाख अण्टीजन टेस्ट आल्या असताना खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट करण्याचा महापालिकेचा अट्टाहास का? महापालिकेचा यामागे मोठा भ्रष्टाचार असून, तो उघड करण्याचा इशारा कदम यांनी दिला.
महापालिकेचे कर्मचारी पत्रक घेऊन आले त्यावेळी त्यांनी आम्हाला खाजगी लॅबचा संदर्भ देत त्याठिकाणी दोन हजार ८00 रुपये देऊन कोविड टेस्ट करण्याचे सांगितले. आम्ही इतकी महागडी टेस्ट करणार नाही, असे दुकानदारांनी म्हटल्यावर कोविड टेस्ट न केल्यास दुकाने सील करण्याची धमकी कर्मचारी दिल्याची माहिती दुकानदार नजीब शेख यांनी दिली.
दरम्यान, महापालिकेने टेस्ट करण्याचे आवाहन केले तर ती चाचणी मोफत करावी, अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील सर्व दुकानदारांना कोविड टेस्ट करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. ते ज्या प्रभाग समितीअंतर्गत येतात, त्याच ठिकाणच्या जवळच्या लॅबचा त्यांना संदर्भ दिला जातो. पण, त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. ते कुठेही टेस्ट करू शकतात. दुकाने सील केले जाईल, असे पालिकेने सांगितलेले नाही.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Web Title: Forced to test in a private lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.