ठाणे - ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असलेल्या एनआयसीयु विभागासाठी आता पाच अत्याधुनिक स्वरुपाचे व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. तसेच आयसीयु विभागासाठी देखील व्हेटींलेटर घेतले जाणार असून असे एकूण २० व्हेटींलेटर खरेदीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात व्हेटींलेटरची अपुरी असलेली सुविधा आणि कळवा रुग्णालयात देखील ही सुविधा पुरेशी नसल्याची वृत्त यापूर्वी लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर आता उशिराने का होईना महापालिकेचे कळवा रुग्णालय आता जागे झाले आहे. त्यानुसार त्यांनी पाच नग व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय घेतला आहे. कळवा रुग्णालयात दाखल होत असलेल्या आंतरुग्णांची संख्या ही ५०० च्या घरात आहे. तर दरवर्षी २५००० च्या आसपास रुग्ण औषधोपचरासाठी दाखल होतात. रुग्णालयात सध्या अस्तित्वात असलेल्या अतिदक्षता विभागाची क्षमता १० खाटांची असून वर्षाला येथे एक हजारांच्या आसपास रुग्ण दाखल होत आहेत. तर ४० खाटांचे बालरुग्ण कक्ष व १० खाटांचे नवजात बालकांसाठीचे अतिदक्षता कक्ष असून या विभागामध्ये बालकांवर व नवजात अर्भकांवर उपचार करण्यात येतात. सध्या येथे ८ ते १० च्या आसपास व्हेटींलेटरची सुविधा उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. परंतु या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या उपचारासाठी दाखल होणाºया अर्भकांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळेच आता रुग्णालय प्रशासनाने येथे व्हेटींलेटरची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एकूण २० व्हेटींलेटर घेतले जाणार आहेत. त्यातील ५ नग व्हेटींलेटर हे बालरोग व नवजात अतिदक्षता विभागासाठी घेतले जाणार आहेत. यासाठी ३ कोटी ३५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर पाच वर्षांसाठी निगा देखभाल करण्याचा खर्च हा १ कोटी १७ लाख २५ हजार एवढा आहे. त्यानुसार एकूण ४ कोटी ५२ लाख २५ हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
नवजात बालकांसाठी कळवा रुग्णालयात पाच अत्याधुनिक व्हेटींलेटर होणार उपलब्ध, आयसीयुसाठी देखील व्हेटींलेटर घेण्याचा पालिकेचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:22 IST
नवजात बालकांसाठी आता कळवा रुग्णालयात अत्याधुनिक स्वरुपाचे पाच व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ४ कोटी ५२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
नवजात बालकांसाठी कळवा रुग्णालयात पाच अत्याधुनिक व्हेटींलेटर होणार उपलब्ध, आयसीयुसाठी देखील व्हेटींलेटर घेण्याचा पालिकेचा प्रस्ताव
ठळक मुद्देआयसीयुसाठी देखील नवे व्हेटींलेटर होणार उपलब्धएकूण २० व्हेटींलेटर केले जाणार खरेदी