जान्हवी मोर्ये, ठाणे मुंबईतील कापड गिरण्याचा जीवघेणा संप व त्यातून निर्माण झालेली ‘लस्ट फॉर लालबाग’ हा विषय मराठी साहित्यात प्रथमच लस्ट फॉर लालबागच्या रुपाने आला आहे. हा विलक्षण विषय आहे. तसेच तो स्फोटक व मर्मभेदी आहे. १९८२ साली झालेल्या संपाने, जागतिकीकरणाच्या लाटेत गिरण्या बंद पडल्या, त्यातील कामगार उद्ध्वस्त झाला. ती समस्या कादंबरीतून मांडत असताना प्रेमकथाही भेटत गेली, असे उद्गार पानिपतकार विश्वास पाटील यांनी लोकमतशी ‘लस्ट फॉर लालबागच्या’ प्रकाशन सोहळ्या निमित्ताने साधलेल्या संवादात काढले.ही एक विलक्षण प्रेमकथा व समस्या मांडणारी कादंबरी आहे. तिच्या निमित्ताने मी प्रेम अनुभवले आहे. साहित्य हे प्रवाही राहिले पाहिजे. तरच ते वाचकाला भावते. ही कादंबरी लिहिताना आनंद व अभिमान वाटला. पंढरपूरच्या वारीला निघणाऱ्या यात्रेकरूकडे पैसे नसतात. तरीही त्याला या वारीत एक चैतन्य अनुभवायला मिळते. मी ही साहित्य दिंडीचा वारकरी झालो. साहित्यातून उभे केलेले खरेखुरे वातावरण वाचकांना नेहमीच भावते. त्यामुळे माझ्या ८०० पानांच्या कादंबऱ्या वाचक दोन दिवसांत वाचून काढतात. हातात घेतलेले पुस्तक वाचकाला खाली ठेवावेसे वाटत नाही. तहानभूक हरपून ते एका बैठकीत वाचून काढतात. यावरून वाचक हा सकस साहित्यासाठी भुकेला असतो. ते त्याला दिले तर तो त्याला नक्कीच पसंती देतो, असा माझा अनुभव आहे. मीदेखील वाचकाची ही भूक लक्षात घेऊन सकस साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला. मी शासकीय नोकरी सांभाळून हे सगळे केले आहे. आवड असली तर सवड मिळते. माझ्या आवडीसाठी सवड काढली, असे त्यांनी सांगितले.जीवन जगत असताना जीवनात मला अनेक माणसे भेटली. जशी नदी भेटली, निसर्ग भेटला, नदी ओलांडून गेल्यावर जीवन जगणाऱ्या माणसांच्या समस्या भेटल्या. लोकविलक्षण घटना दिसल्या. त्या लोकविलक्षण घटना माझ्या साहित्याची प्रेरणा ठरल्या, असे ते म्हणाले. शासकीय नोकरी असताना कांद्याचे आंदोलन झाले होते. त्या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात, राबणाऱ्या हाताला काय हवे असते, त्याने कष्ट करून शेतातून पिकविलेल्या पिकाला हमीभाव मिळत नाही, ही समस्या मनाला भिडली. मी एक शासकीय अधिकारी असलो तरी प्रथम माणूस आहे. त्यामुळे माणूस म्हणून या समस्या माझ्या मनाला भिडणाऱ्या ठरल्या. तसेच माझे मन हेलावणाऱ्या ठरल्या. त्यातून मला काही तरी लिहावे वाटले.लोकविलक्षण घटनांचा मनात झालेला कोंडमारा मी लेखणीच्या वाटे फोडला. पुण्यात बदली झाल्यावर पुण्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न जवळून पाहिले. त्यातून ‘झाडाझडती’ने आकार घेतला. त्यांच्या जीवनाची झाडाझडती कादंबरी रुपाने मांडली. त्यापाठोपाठ ‘पानिपत’ लिहिली. ‘पानिपत’ आणि ‘झाडाझडती’ हे दोन्ही भिन्न विषय असले तरी पानिपतसाठी सगळा इतिहास वाचून काढला. अनेक संदर्भ तपासले. तसाच अभ्यास पुढे नेताजीसाठी करावा लागला. महानायक लिहिताना त्यांच्या प्रेमात पडलो. पात्रे उभी करताना लेखक त्यांच्यावर जोपर्यंत जिवापाड प्रेम करीत नाही, त्यांचे चरित्र समजून घेत नाही, तोपर्यंत तो ती सशक्तपणे उभी करू शकत नाही. केवळ प्रेमातच पडणे नसते, तर त्या भूमिकेकडे तटस्थपणे पाहून त्यांची मांडणी भाषेच्या अंगाने करणे हेही अपेक्षित असते असे ते म्हणाले..
‘लस्ट फॉर लालबाग’मुळे गिरणी संप साहित्यात प्रथमच
By admin | Updated: November 9, 2015 02:32 IST