भिवंडी : शहरातील नारायण कम्पाउंड येथे असलेल्या एका मोती कारखान्याला शनिवारी रात्री नऊ वाजता आग लागली. आगीत मोती कारखाना जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या या ठिकाणी कुलिंगचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. हा मोती कारखाना नागरी वस्तीत दाटीवाटीच्या परिसरात असल्याने नागरिकांत काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीमागचे कारण अजून समजू शकलेले नाही. भिवंडीत मोती कारखान्यासह यंत्रमाग कारखाने, गोदामे, डाइंग व सायजिंग यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, महापालिका व पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचे या आगींकडे दुर्लक्ष होत आहे.
भिवंडीत मोती कारखान्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST