राजू काळे / भार्इंदरमीरा रोडमधील सृष्टी परिसरात राहणाऱ्या विनायक कोरगावकर या १३ वर्षीय कराटेपटूने ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. त्याला या खेळात आणखी नैपुण्य मिळविण्यासाठी राज्य, राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळणेही कठीण झाले आहे अशी खंत विनायकने ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.शहरात अनेक नामांकित खेळाडू असून त्यातील काहींना खेळासाठी जागा नाही तर काहीजणांकडे खेळात नाव कमविण्यासाठी पुरेसा पैसा नाही. अशीच परिस्थिती मीरा रोडच्या विनायकची आहे. सृष्टीच्या शांतीगार्डन प्रकल्पातील शांतीधाम गृहसंकुलात राहणारा विनायक जवळच्याच सेंट पॉल हायस्कूलमध्ये सातवीत शिकत आहे. शाळेत जाऊ लागल्यापासून तो कराटेचे धडे गिरवत आहे. पाचवीत असताना त्याने ब्लॅकबेल्ट मिळविला. दरम्यान त्याने जिल्हा व मुंबई स्तरावरील अनेक स्पर्धांत सहभाग घेऊन चमकदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली. या प्रवासादरम्यान त्याला कधीच राज्यस्तरीय स्पर्धा खेळता आल्या नाहीत. डिसेंबरमध्ये त्याला गुजरातमधील बलसाड येथे जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी कुटुंबाने पैशाची जमवाजमव केली. त्यात त्याने सुवर्ण पदकही मिळविले. यंदा त्याला गोव्यामध्ये होत असलेल्या स्पर्धेसाठी जायचे आहे. परंतु, पुन्हा त्याचा खर्च कुटुंबाला पेलवणारा नसल्याने त्याने स्पर्धेला न जाण्याच्या निर्णय घेतला आहे. वडील एका खाजगी कंपनीत तुटपुंज्या वेतनावर काम करतात. त्याला दोन बहिणी असून एक अलिकडेच तात्पुरत्या स्वरुपात नोकरीला लागली आहे. तर दुसरी बहीण १२ वीत शिकत आहे. घरातील दोन व्यक्तींच्या किमान वेतनावर घराचा गाडा चालत नसल्याने परराज्यातील स्पर्धेचा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न कुटुंबापुढे उभा राहिला आहे.
कराटेपटूच्या पंखाला हवे आर्थिक बळ
By admin | Updated: January 25, 2017 04:45 IST