कल्याण : कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केडीएमटी उपक्रमाची फरफट सुरूच आहे. जून महिन्यात पहिल्या आठवड्यात वेतन दिले होते. परंतु, महापालिकेच्या लेखा विभागाने वेतनासंदर्भात पुन्हा फेरमंजुरी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्याने वेतनविलंबाची परंपरा कायम आहे. परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केडीएमसीकडून एक कोटीचे अनुदान दरमहिन्याला मिळते. हे अनुदान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळावे, अशी मागणी सातत्याने परिवहन सदस्यांकडून केली जाते. या अनुषंगाने परिवहन समितीच्या बैठकीत ठरावही केले आहेत. परंतु, केडीएमसीकडून अनुदानाला विलंब होत असल्याने परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळते. एप्रिल महिन्याचे वेतनही २४ मे रोजी कर्मचाऱ्यांच्या हाती पडले होते. दरम्यान, जूनमध्ये शाळा सुरू होत असल्याने परिवहनचे शिवसेना सदस्य दत्तकुमार खंडागळे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्यासह महापालिकेच्या लेखा विभागाकडे पत्रव्यवहार करून १ कोटी अनुदान तत्काळ वर्ग करण्याची मागणी केली होती. जूनमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू होतात. त्यामुळे मुलांचे शाळेचे गणवेश, पुस्तके, शाळेची फी इत्यादी खर्चासाठी परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे वेतन जूनच्या पहिल्या आठवड्यात दिले जावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासणार नाही, याकडे खंडागळे यांनी लक्ष वेधले होते. यावर, परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनीही महापालिका प्रशासनाकडे तातडीने पत्रव्यवहार केला होता. यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले होते. परंतु, विलंबाची परंपरा कायम राहिली असून जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी कर्मचाऱ्यांच्या हातात वेतन पडलेले नाही. वेतनासाठी कर्मचारी संघटना वारंवार पाठपुरावा करतात. गेल्याच महिन्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजपाप्रणीत संघटनेने महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार, असे जाहीर केले होते. त्यामुळे वेतनाला झालेला विलंब पाहता संबंधित संघटना गेली कुणीकडे, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
केडीएमटीची वेतनासाठी फरफट
By admin | Updated: July 12, 2016 02:27 IST