एफडीएने नष्ट केला २० कोटींचा गुटखा; वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:14 AM2018-04-21T01:14:29+5:302018-04-21T01:14:29+5:30

राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत ठाणे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोकण विभागात सुमारे २४ कोटींचा गुटखा जप्त केला असून, त्यापैकी २० कोटींचा गुटखा नष्ट केला आहे.

FDA destroys 20 crores worth of gutka; Use of railways for transport | एफडीएने नष्ट केला २० कोटींचा गुटखा; वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर

एफडीएने नष्ट केला २० कोटींचा गुटखा; वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर

Next

- पंकज रोडेकर

ठाणे : राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत ठाणे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोकण विभागात सुमारे २४ कोटींचा गुटखा जप्त केला असून, त्यापैकी २० कोटींचा गुटखा नष्ट केला आहे. बंदी असतानाही चोरट्या मार्गाने अजून गुटखा परराज्यांतून राज्यात दाखल होत आहे. पोलीस कारवाई सुरू असली तरी आतापर्यंत एकाही गुटखा आणणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोलिसांना पोहोचता आलेले नाही. त्याचबरोबर रेल्वेमार्गे गुटखा सर्रास येत आहे. गुटखानिर्मिती आणि विक्रीला बंदी असतानाही सर्वच कर लावून त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
२०१२पासून मार्च २०१८पर्यंत एफडीएने गुटख्यासंदर्भात कोकण विभागात ३१ हजार ४०० तपासण्या केल्या. यामध्ये सात हजार ठिकाणी कारवाई करून २३ कोटी ९५ लाख ९९ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. त्यापैकी, १९ कोटी ९० लाखांचा गुटखा आतापर्यंत नष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३४१ एफआयआर दाखल
ही कारवाई करताना, आतापर्यंत एफडीएने कोकण विभागातील ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांत ३४१ एफआयआर दाखल केले आहेत. मात्र, हाती काहीच लागलेले नाही.
३६ खटले कोर्टात दाखल
२०१७-१८ या वर्षभरात एफडीएने १२७ ठिकाणी कारवाई केली आहे. यामध्ये सहा कोटी एक लाख १० हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त करताना रत्नागिरीत एका ठिकाणी एफआयआर दाखल केला आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ८६ ठिकाणी कारवाई केली आहे. रायगड-३१, सिंधुदुर्ग-७ आणि रत्नागिरीत ३ ठिकाणी कारवाई केली आहे. तसेच भिवंडीत दोन कोटींचा, तर वसईत एक कोटी ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील ३६ प्रकरणे कोर्टात दाखल झाली आहेत. डम्पिंगवर गुटखा होतोय नष्ट
२०१२, २०१३, २०१४ या तीन वर्षांतील जप्त केलेला गुटखासाठा पुण्यात नष्ट केला. त्यानंतर, मात्र त्या जिल्ह्याच्या हद्दीतील डम्पिंगवर गुटखा नष्ट केला जात आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील गुटखा नवी मुंबईतील डम्पिंगवर केला जात आहे.

बंदी लागू झाल्यापासून दरवर्षी कारवाई सुरूच आहे. तसेच एफआयआर दाखल करूनही पकडलेला माल कुठून आला आणि कुठे जाणार आहे, याची माहिती कळू शकलेली नाही.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त, कोकण विभाग

Web Title: FDA destroys 20 crores worth of gutka; Use of railways for transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे