- धीरज परबमीरा रोड - भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल्याने तेथे कोंडी होत आहे. १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला असतानाही त्याचे काटेकोर पालन केले जात नाही.छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा रस्ता थेट उत्तन - चौक व गोराई - मनोरीपर्यंत जातो. तर याच मार्गावर पुढे शिवसेना गल्ली नाका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग सुरु होतो. शिवसेना गल्ली नाका या मुख्य जंक्शन पासून थेट बावन जिनालय, जैन मंदिरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे पुढे अग्निशमन दल केंद्र व पुढे ९० फुटी मार्गाच्या नाका परिसरापर्यंत हे अतिक्रमण आहे. या शिवाय अनेक दुकानदारांनी पदपथ बळकावला आहे. या ठिकाणी सम - विषम पार्किंग झोन जाहीर केले असले तरी त्याचे सर्रास उल्लंघन करत दोन्ही बाजूला पार्किंग केले जाते.शिवसेना नाका ते बावन जिनालयपर्यंत तर फेरीवाल्यांनी धुमाकूळ घातला असून हा संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. मध्यंतरी महापालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे आखून फेरीवाल्यांना बसण्यासाठी दिले होते. पण त्या पट्यांना देखील फेरीवाल्यांनी काळं फासत रस्त्यावर बस्तान बसवले आहे. हे फेरीवाले रात्रीही आपल्या गाड्या, बाकडे तेथेच ठेवतात. मध्यंतरी पालिकेने या बाकड्यांवर कारवाई केली होती. पण पुढे थांबवण्यात आली.वास्तविक या ठिकाणी जुने गणेश मंदिर, बावन जिनालय, डॉन बॉस्को शाळा आदी अनेक धार्मिक स्थळे, रुग्णालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व क्षेत्राच्या १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशांना देखील पालिका व संबंधितांनी केराची टोपली दाखवत फेरीवाल्यांना पाठिशी घालण्याचे काम चालवले आहे.महापालिकेकडूनही फेरीवाल्यांसह अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर ठोस कारवाई केलीच जात नाही. फेरीवाल्यांसह बाजार वसुली करणारा पालिका कंत्राटदाराचे सत्ताधारी व प्रशासनाशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. फेरीवाल्यांवर कारवाई केली तर कंत्राटदाराचे मोठे नुकसान होते. तसेच यात संबंधितांना देखील तोटा होत असल्याने धडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.कारवाईबाबत संबंधित यंत्रणा दाखवतात एकमेकांकडे बोटेअतिक्रमण करणाºयांविरोधात फौजदारी कारवाईची तरतूद आहे. पण पालिका व पोलीस गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी करतात.वाहतूक पोलीस देखील या कोंडीला कारणीभूत ठरणाºया बाबी लेखी स्वरुपात मांडून कारवाई करत नाही.लोकप्रतिनिधी, प्रशासन, वाहतूक पोलीस े रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूककोंडी दूर करण्याऐवजी निव्वळ एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकत आहेत.
फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:18 IST