लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : काही वैद्यकीय व्यावसायिक सहव्याधी असलेल्या वृद्ध रुग्णांना घरीच विलगीकरणाचा सल्ला देत आहेत. त्यांनी तसा सल्ला देऊ नये, असे आवाहन खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांचे निदान लवकर होऊन, त्याला त्वरित उपचार मिळावेत, यासाठी तापाच्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट केली जाते. काही व्यावसायिक सहव्याधी असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरणाचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना घरी विलगीकरणाचा सल्ला खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी देऊ नये, अशी नोटीस खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बजाविण्यात आली आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. साधा ताप आला तरी नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापाची औषधे व गोळ्य़ा घेतात. अशा रुग्णाला कोरोनाची बाधा झालेली असल्यास त्याला उपचार मिळण्यास विलंब होतो. त्याच्याकडून अन्य रुग्णांना लागण होऊ शकते. त्याचबरोबर संबंधित रुग्णाचीही प्रकृती खालावू शकते. त्यामुळे औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देऊन नयेत. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरचे नाव, पदनाम, रुग्णाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राला देण्याचे औषध विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. एखाद्या औषध विक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या साहाय्यक आयुक्तांकडून कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध विक्रेत्यांना सूचित करण्यात आले आहे.
------------------