ठाणे - निरोगी आयुष्य जगायचे असेल तर सेंद्रिय पद्धतीने केलेल्या भाजीपाल्यांचा वापर आहारात करायला हवा, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. त्यासाठी ठाणे पालिकेने एक एकराच्या जागेवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्यांची लागवड करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ठाणे पालिकेच्या वतीने आयोजित ‘वृक्षवल्ली-२०२५’ प्रदर्शनाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
झाडांमुळे आपण जगतो आणि आनंदी राहतो, वृक्षवल्ली प्रदर्शन म्हणजे ठाणे पालिकेची एक प्रकारची मोहीमच आहे. एक सुंदर आणि आदर्श गाव कसे असते, ते पाहायचे असेल तर माझ्या गावाला या. इथे ५०० प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे, असे शिंदे म्हणाले. विविध जातींची फुले, फळझाडे, आदींसह इतर वृक्षांची लागवड करण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे शहर हे सुंदर, स्वच्छ होत असताना त्याला हरित शहर केले पाहिजे. पालिकेने एक एकर जागेत सेंद्रिय भाजीपाला पिकवावा आणि एक आदर्श निर्माण करावा, असे शिंदे पुढे म्हणाले.
ऑक्सिजन पार्कचा प्रयत्न ठाणे पालिकेच्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक वृक्ष लावून घ्यावा. त्याचे संगोपन करावे. निसर्गाची जपणुकतेसाठीच समृद्धी महामार्गात अधिकचे पैसे खर्च केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्राण्यांना मोकळ्या वातावरणात फिरता यावे यासाठी तेथे मार्ग तयार केले आहेत. ठाण्याच्या सेंट्रल पार्कमध्ये आणखी वृक्षांची लागवड केली पाहिजे. याशिवाय जागोजागी ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
५००० रोपांचा समावेश यंदाचे प्रदर्शन‘जैवविविधतेचे सप्तरंग’ या संकल्पनेवर आधारित आहे. प्रदर्शनात २०० प्रजातींची फुलझाडे, फळांची रोपे, रंगीबेरंगी फुले व औषधी वनस्पती, आदी मिळून पाच हजार रोपांचा समावेश आहे.