राममंदिर भूमिपूजनामुळे अवघा सोशल मीडिया झाला रामनाममय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:50 AM2020-08-06T00:50:26+5:302020-08-06T00:51:26+5:30

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर दिवसभर रामनामाचा घोष : प्रभू रामचंद्रांची चित्रे, अयोध्यानगरी, प्रस्तावित मंदिराच्या पोस्ट झाल्या व्हायरल

Due to Bhumipujan of Ram Mandir, social media became very famous | राममंदिर भूमिपूजनामुळे अवघा सोशल मीडिया झाला रामनाममय

राममंदिर भूमिपूजनामुळे अवघा सोशल मीडिया झाला रामनाममय

Next

ठाणे : अयोध्या नगरीत राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी पार पडला. मात्र, मंगळवारी रात्रीपासूनच सोशल मीडिया प्रभूरामचंद्रांच्या पोस्ट आणि रामनामाच्या घोषाने रामनाममय झालेला पाहायला मिळाला. सोशल मीडियावर प्रभूरामचंद्रांची, अयोध्या नगरीची छायाचित्रे, प्रस्तावित मंदिराचे चित्र यासह प्रभूरामांच्या चित्रासोबत आपल्या नावाचे आद्याक्षर असलेल्या इमेजेस पोस्ट केलेल्या होत्या.

कोणताही सण-उत्सव असो, की एखादी महत्त्वाची घटना असो, त्याचे पडसाद सोशल मीडियावर हमखास उमटतात. अयोध्येत बुधवारी झालेल्या प्रभू राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता होती. हीच उत्सुकता सोशल मीडियावर पाहायला मिळाली. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे प्रभूरामांची चित्रे शेअर केली जात होती. ‘एकही नारा, एकही नाम, बोलो जयश्रीराम’, ‘रामलल्ला आएंगे, मंदिर वही बनाएंगे’, ‘गर्व से कहो हम हिंदू है..’, ‘शतकांचा संघर्ष रामजन्मभूमीसाठी, ‘राम राम जयश्रीराम’, असे मेसेजेस पोस्ट केले जात होते. प्रभूरामचंद्रांची चित्रे, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची चित्रे, प्रस्तावित राममंदिराचे चित्र, सजलेल्या अयोध्या नगरीची छायाचित्रे, भारताच्या नकाशात प्रभूरामचंद्रांची रेखाटलेली चित्रे एकमेकांना शेअर केली जात होती.

दिव्यात जल्लोष, मुंब्य्रात शांतता
मुंब्रा : राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त दिव्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. साबे गाव, बीआरनगरमध्ये पावसाच्या साक्षीने प्रभू रामाच्या प्रतिमेची पूजा करुन महाआरती करण्यात आली. यावेळी नागरिकांना मिष्टान्नाचे वाटप केल्याची माहिती शीळ विभागाचे भाजपचे अध्यक्ष आदेश भगत, तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन भोईर यांनी दिली. मुंब्य्रातही काही घरांसमोर रांगोळ्या काढून, पणत्या प्रज्वलित करून आनंद साजरा करण्यात आला. खबरदारी म्हणून मुख्य रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

३३ वर्षे लिहीत आहेत जप
भिवंडी : देवावरील भक्ती व श्रद्धेपोटी भक्तांकडून नित्यपूजा केली जाते. परंतु, आपला व आपल्या कुटुंबीयांचा उत्कर्ष प्रभू श्रीरामाच्या भक्तीने होणार या श्रद्धेपोटी १९८७ पासून दररोज वहीवर ‘राम राम’ असे लिहून रामनामाचा जप ३३ वर्षांपासून एका भक्ताने आजही सुरूच ठेवला आहे. काल्हेर येथील पंढरीनाथ तरे यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीही रामनामाचा जप करत ‘राम राम’ असे दररोज वहीत लिहून ठेवले आहे. १९८७ पासून याला सुरुवात झाली. रामाचा जप लिहून ते दिवसाची सुरुवात करतात. पाहता पाहता ६० वह्या जपाने भरल्या आहेत. प्रत्येक वहीस क्रमांक व प्रत्येक दिवसाची तारीख त्यावर लिहून ठेवली आहे. आज ३३ वर्षे झाली तरी हा जप लिहिण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले आहे. हातपाय डोळे धडधाकट असेपर्यंत हे सुरू ठेवणार असून, श्री रामाच्या मंदिराचे भूमिपूजन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

अंबरनाथ,बदलापूरमधील मंदिरांमध्ये पूजा
अंबरनाथ/बदलापूर : अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त अंबरनाथमधील विविध राम मंदिरांत भक्तांनी पूजेचे आयोजन केले होते. भाजपच्या वतीने शिव मंदिर परिसरात रामाचे पूजन करण्यात आले, तर गावातील राम मंदिरात मिठाईचे वाटप करण्यात आले. बदलापूरमध्येही आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पूजन झाले. भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले, खानजी धल यांच्या वतीने शिव मंदिर परिसरात पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याचठिकाणी साध्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर, अंबरनाथमधील कोसगावच्या राम मंदिरात ग्रामस्थांनी मिठाईचे वाटप केले.

घरात उभारली गुढी... ठाणे : राममारुती रोड येथील विद्वांस कुटुंबाने बुधवारी झालेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजनानिमित्त गुढी उभारून या दिवसाचा आनंदोत्सव साजरा केला. सकाळी त्यांनी पूजा करून श्रीरामाची आरती म्हटली. तसेच, या कुटुंबाने संध्याकाळी रांगोळी काढून दीपोत्सव साजरा केला.

शिवसेनेकडून रामरक्षा पठण
कल्याण : अयोध्येत सुमारे ७०० वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर साकारत असलेल्या राम मंदिराचे भूमिपूजन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्याचा आनंद व्यक्त करण्याकरिता कल्याण पूर्वेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रभू रामाची प्रतिकृती उभारत रामरक्षा पठण करीत रामाची पूजा केली. यावेळी शाखाप्रमुख प्रशांत बोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्रीरामाची आरती केली आणि स्थानिक नागरिकांना अयोध्येतील सोहळ््यात सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा अनुभव प्राप्त करून दिला. या कार्यक्रमात आजूबाजूचे नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहभागी झाले होते.

मीरा-भार्इंदरमध्ये जल्लोष
मीरा रोड : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्ताने मीरा भार्इंदरमध्येही जल्लोष केला. सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करणारे फोटो टाकले जात होते. सायंकाळी नागरिकांनी घरात पणत्या लावल्या. भार्इंदर पूर्वेच्या काशीविश्वेश्वर मंदिरात काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांनी कलश डोक्यावरून नेत शंकराच्या पिंडीला अभिषेक केला. मंदिराच्या वतीने चांदीची वीट अयोध्येला पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले . भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी काशिमीरा उड्डाणपुलाखाली पेढे वाटले. भाजपच्या मीरा रोडमधील नगरसेविकेच्या दाराबाहेर गुढी उभारली आणि रांगोळी काढली. भार्इंदरच्या एस व्ही मार्गावरील इमारतींना भाजप नगरसेवकाने रोषणाई केली होती . शिवसेनेच्या वतीने लाडू वाटप, आरती करण्यात आली.


श्रीरामाने दिलेले वचन सत्यात येत आहे
तृतीयपंथींच्या भावना : ठाण्यात साजरा केला आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे, याचा आमच्या समाजाला अभिमान वाटत आहे. मंगळवार रात्रीपासून याचा आनंदोत्सव आम्ही साजरा करीत आहोत. श्रीरामप्रभूंनी आम्हाला दिलेले वचन सत्यात येत आहे आणि याचा अनुभव आम्ही घेत आहोत, अशा भावना तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या करीना अडे आणि माधुरी सरोदे-शर्मा यांनी व्यक्त केल्या.
अयोध्येत बुधवारी पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद जय श्रीरामाच्या नामघोषात साजरा केला जात असताना दुसरीकडे तृतीयपंथी समाजानेही आपला आनंद व्यक्त केला.

करीना आणि माधुरी यांनी सांगितले की, आजच्या दिवसाचा आम्हाला खूप आनंद होत आहे. त्या पुढे म्हणाल्या, श्रीराम वनवासाला निघाले. त्यांना अयोध्येच्या वेशीवर सोडायला आलेल्या जनसमुदायाला ते म्हणाले, सभ्य स्त्री-पुरुष हो, मी वनवासाला प्रस्थान करीत आहे. आपण आता जा. प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाहून परत आले, तेव्हा त्यांना वेशीवर काही समूह जमलेला दिसला. श्रीरामांनी त्यांना विचारले की, तुम्ही इथे का थांबला आहात. तर, ते म्हणाले की, तुम्ही वनवासाला जात असताना स्त्री-पुरुषांना जा म्हणाले. मात्र, आम्ही दोन्ही नाहीत म्हणून आम्ही तुमची त्या दिवसापासून वाट पाहत येथे थांबलो आहोत. आम्हाला जायला नव्हते सांगितले. प्रभूराम त्यांच्या या निखळ प्रेमाने गहिवरले आणि म्हणाले, यापुढे आता तुमचे राज्य असेल. तुम्ही जे म्हणाल, ते सत्य होत जाईल. आज अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. आमच्या समाजाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. श्रीरामप्रभूंनी आम्हाला वरदान दिले होते की, कलियुगात आमचे राज्य येईल, ते येण्यास सुरुवात होईल.

Web Title: Due to Bhumipujan of Ram Mandir, social media became very famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.