डॉक्टर बनण्याचा अट्टहास नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:21 AM2019-11-03T00:21:37+5:302019-11-03T00:21:48+5:30

आपल्या देशात डॉक्टरला समाजात वेगळीच प्रतिष्ठा आहे.

Don't want to be a doctor! | डॉक्टर बनण्याचा अट्टहास नको!

डॉक्टर बनण्याचा अट्टहास नको!

googlenewsNext

विदेशात आणि भारतात प्रत्येक बाबतीत वेगळेपणा आहे. वातावरण, वावर, भौगोलिक परिस्थिती, इकडचे आजार, इकडच्या लोकांचे राहणीमान, त्यांच्या शरीराची रचना यामध्ये कोसाकोसांवर बदल होतो. त्यामुळे रुग्णांच्या स्वभावाचा कल सांभाळून त्यांच्यावर उपचार करावे लागतात. त्यासाठी डॉक्टरांना येथील रुग्णांबरोबर रुळावे लागते. म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज सर्वात महत्त्वाचे आहे. परदेशातील वातावरणात शिकलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव असण्याचे कारण नाही. त्यामुळे रुग्णांना तपासण्याची तयारी, योग्यता तपासणे आवश्यक आहे. अन्यथा, ते रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे होईल. त्यामुळेच नॅशनल बोर्ड आॅफ एक्झामिनेशनतर्फे परदेशातून परतणाऱ्या डॉक्टरांची फॉरेन मेडिकल गॅ्रज्युएट्स एक्झाम (एफएमजीई) घेण्यात येते आणि ती आवश्यकच आहे. या परीक्षेत नापास होण्याचे प्रमाण जास्त आहे, हे खरे आहे. अशावेळी विद्यार्थ्यांची तयारी, ते कोणत्या विद्यापीठात प्रवेश घेतात, तेथील अभ्यासक्रमाचा दर्जा, प्रॅक्टिकल याबाबत नक्कीच विचार करावा लागेल.

आपल्या देशात डॉक्टरला समाजात वेगळीच प्रतिष्ठा आहे. सध्या डॉक्टर बनणे सोपे राहिलेले नाही. पैसा आणि गुणवत्ता या दोन्ही बाजू भक्कम असतील तरच डॉक्टरकीचे स्वप्न पाहता येते, अशी सध्याची परिस्थिती आहे. ‘नीट’मध्ये चांगले यश मिळाले तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत जागा मिळते, अन्यथा खाजगी महाविद्यालयांची वाट धरावी लागते. अनेकांना खाजगी महाविद्यालयांची फी न परवडल्यामुळे ते हा नादच सोडून देतात, तर ज्यांच्याकडे पैसा आहे, ते एकतर भरमसाट फी भरून खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेतात किंवा रशिया, युक्रेन, चीन, बांगलादेश, मॉरिशस यासारख्या देशांची वाट धरतात. अनेकदा घरातूनच मुलावर डॉक्टर बनण्यासाठी दबाव असतो. अशा विद्यार्थ्यांचेच प्रमाण नापासांमध्ये सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विद्यार्थी भारतात परततात तेव्हा त्यातील फारच थोडे विद्यार्थी येथे व्यवसाय करण्यास पात्र ठरत असावेत.

देशामध्ये वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हा आवाक्याबाहेर गेलेला आहे. त्या तुलनेत परदेशात कमी फी आहे. परदेशात शिक्षणाकरिता जाण्यामागचे हेही प्रमुख कारण असावे. पण, हे करताना ज्याठिकाणी आपण शिक्षण घेणार आहोत, तेथील शिक्षणपद्धती, अभ्यासक्रमाचा दर्जा, संबंधित विद्यापीठ-महाविद्यालयांबाबत कोणती खातरजमा न करताच प्रवेश घेतले जातात. साहजिकच, त्याचा दर्जावर परिणाम होणारच. काही ठिकाणी धड शिकवले जाते की नाही, याबाबत शंकाच आहे. तुम्ही दर्जेदार शिक्षण घेतले असेल तर डॉक्टरची पदवी मिळवणाऱ्यांवर नापास होण्याची वेळच का यावी? सर्वच पात्र नसतात असे म्हणता येणार नाही. माझ्या हाताखाली रशियातून वैद्यकीय पदवी मिळवलेल्या चार विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केलेली आहे. त्यांच्याबाबत माझा अनुभव चांगला आहे. त्यामुळे पात्रता आणि गुणवत्ता असेल तर परीक्षेचा काहीच प्रश्न यायला नको. शिवाय, पालक आणि विद्यार्थी जेव्हा परदेशात वैद्यकीय शिक्षणाबाबत निर्णय घेतात, तेव्हा त्यांना ही परीक्षा असते हेही माहिती असेलच. तेव्हापासूनच या परीक्षेबाबतच्या तयारीचे नियोजनही केले पाहिजे.
कोणी विद्यार्थी किंवा त्याचे पालक मला याविषयी सल्ला विचारतात, तेव्हा मी त्यांना देशातच त्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देत असते. येथील अभ्यासक्रम हा येथील गरजांनुसार बनवलेला असतो. परदेशातील अभ्यासक्रम हा त्या-त्या देशांतील गरजांनुसारच असणार. त्यामुळे येथे शिक्षण घेतल्यास ते अधिक योग्य राहील. आपल्याकडे विविध साथीचे रोग, जसे डेंग्यू, मलेरिया असे आजार आहेत. कुपोषण आहे. हे आजारच तेथे नसतील तर त्याचे तेथे प्रॅक्टिकल ज्ञान मिळणार नाही. त्यामुळे ‘नीट’ची चांगली तयारी कर. अपयश आले तर पुन्हा प्रयत्न कर. अन्यथा इतर मार्ग स्वीकार. कुठच्याही क्षेत्रात समाजासाठी अनेक गोष्टी करता येतात, असा सल्ला
देत असते.
(लेखिका कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आहेत)
(शब्दांकन : स्वप्नील पेडणेकर)

‘नॅशनल बोर्ड आॅफ एक्झामिनेशन’ने केलेल्या विश्लेषणात परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. मात्र, ती उत्तीर्ण होणाºयांचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामागचे नेमके कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी साधलेला संवाद...

Web Title: Don't want to be a doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.