- मुरलीधर भवार, कल्याणडोंबिवलीच्या एमआयडीसीत स्फोट झाला, तेव्हा निवासी आणि औद्योगिक वस्त्यांत बफर झोन पाळला नसल्याबद्दल कारखानदारांनी महापालिकेवर ठपका ठेवला. मात्र बफर झोनबाबत पालिकेवर झालेले आरोप चुकीचे असून तेथील बांधकामांना एमआयडीसीच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी ‘लोकमत’कडे मांडले. महापालिकेने परवानगी दिल्याने औद्योगिक क्षेत्रात बांधकाम झाल्याचा आरोप चुकीचा आहे. तेथील सर्व जबाबदारी औद्योगिक विकास महामंडळाची आहे. तेथील प्रदूषण, स्फोट हे विषय महापालिकेशी संबंधित नाहीत, याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. या मुद्द्यांवरून पालिकेला टार्गेट करणे चुकीचे असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट व्हावीत, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी आधीच्या प्रस्तावांत सुधारणा करण्यात आली आहे. सध्या ज्या पद्धतीने नवा आराखडा तयार केला जात आहे, ते पाहता भविष्यात ही शहरे स्मार्ट होतील आणि केंद्र सरकारच्या नव्या यादीत या शहरांचा नक्की समावेश होईल, असा ठाम विश्वासही रवींद्रन यांनी व्यक्त केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे १७ आणि १८ जूनला स्मार्ट शिखर परिषद भरविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ही दोन्ही शहरे स्मार्ट होण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नऊ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वाधिक भर हा रेल्वे स्टेशन परिसर मोकळा करण्यावर दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
डोंबिवलीतील स्फोटाशी पालिकेचा संबंध नाही
By admin | Updated: June 17, 2016 02:11 IST