डोंबिवली- पं. समीर अभ्यंकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन आणि पं. योगेश समसी यांचे तबलावादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ते स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती आणि नागरी सत्कार समिती डोंबिवली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शतांजली तालस्वरांची’ या कार्यक्रमाचे.स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती आणि नागरी सत्कार समिती यांच्यातर्फे तबलानवाज उस्ताद अल्लारखां व गायनाचार्य एस.के. अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष मैफलीचे आयोजन केले होते. शुभमंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या मैफलीत एस. के. अभ्यंकर यांचे नातू पंडित समीर अभ्यंकर आणि तबलानवाज उस्ताद अल्लारखां यांचे शिष्य पं. योगेश समसी यांनी रंग भरले.कार्यक्रमाची सुरूवात समीर यांनी पूर्वा कल्याण राग सादर करून केली. त्यानंतर त्यांनी बडा ख्यालमध्ये ‘गावे गुनी’ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. तालमध्ये विलंबित एकताल त्यांनी सादर केला त्याला प्रेक्षकांची वाहवाह मिळाली. छोटा ख्यालमध्ये आयी सबे आणि ताल द्रूत तीन ताल ही सादर केला. केदार रागात छोटा ख्यालमध्ये ‘कान्हा रे नंदनंदन’ सादर केला तेव्हा प्रेक्षकांची टाळ््याच्या कडकडाटात दाद दिली. ‘मन लागले’ हे भक्तीगीत सादर करून त्यांनी सारे वातावरण भक्तीमय केले. संगीत विद्याहरण नाटकातील नाटयपद ‘विमल अधर निकटी मोह हा पापी’ सादर केले.पंडित योगेश शमसी यांनी पंजाब घराण्याचे परंपरागत सादरीकरण केले. ताल त्रितालातील पेशकार कायदा याचबरोबर रेला यांचे प्रभावी सादरीकरण यावेळी प्रेक्षकांनी अनुभवले. त्याचबरोबर रेल्याच्या जोडीने द्रुत लयीतील रचना त्यांनी सादर केल्या.
तालस्वरांच्या शतांजलीने डोंबिवलीकर झाले मंत्रमुग्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 17:45 IST