कोविड रुग्णालयातील ‘हा’ डॉक्टर तब्बल १३८ दिवस गेला नाही घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:16 AM2020-09-20T01:16:23+5:302020-09-20T01:19:50+5:30

संडे अँकर । कोरोनाची झाली होती लागण : बरा होऊन पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी रुजू

The doctor at Kovid Hospital did not go home for 138 days | कोविड रुग्णालयातील ‘हा’ डॉक्टर तब्बल १३८ दिवस गेला नाही घरी

कोविड रुग्णालयातील ‘हा’ डॉक्टर तब्बल १३८ दिवस गेला नाही घरी

Next

मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-शीळ रोडवरील पडले गावातील एक खाजगी रुग्णालय डेडिकेटेड कोविड रुग्णालय म्हणून सर्वांत प्रथम जाहीर झाले. या रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिंदे हे कोरोना रुग्णांवर रात्रंदिवस उपचार करण्यासाठी १३८ दिवस घरीच गेले नाहीत. मात्र, १३८ व्या दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाली. उपचाराअंती २० दिवसांनी बरे झाल्यानंतर ते पुन्हा रुग्णांच्या सेवेत रुजू झाले.
नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या डॉ. शिंदे यांनी पडले येथे शंभर खाटांचे एक खाजगी रुग्णालय उभारले आहे. जानेवारी २०२० मध्ये सुरू केलेल्या या रुग्णालयाने कोरोनाची साथ पसरताच प्रथम कोविड रुग्ण उपचारासाठी घेण्याकरिता धाडस दाखविले. केडीएमसीनेही हे रुग्णालय कोविड उपचारासाठी अधिग्रहित केले. सुरुवातीला कोरोनाच्या भीतीपोटी जास्त कर्मचारीही नव्हते. तेव्हा अवघे १३ कर्मचारी होते. आता त्यांच्याकडे १८४ कर्मचारी आहेत.
डॉ. शिंदे म्हणाले, ‘मी पहिल्या दिवसापासून रुग्णालयात मुक्काम ठोकला आहे. बाहेर गेल्यास रुग्णांवर उपचार कोण करणार? तसेच बाहेर पडलो तर इतरांनाही लागण होऊ शकते. घरी गेल्यास कुटुंबीयांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे पत्नी, एक वर्षाचा मुलगा, आई-वडील यांना सातारा येथील पाचगणीला गावी पाठवले होते.
१३८ दिवसांत मी सहकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक हजार ३२६ कोरोना रुग्णांवर उपचार केले. याशिवाय आधीच्या ७२६ रुग्णांवर उपचार केले. त्या रुग्णांकडून बिल घेतले नाही. मात्र, त्या बदल्यात मनपाकडून केवळ रुग्णालय वापराचे भाडे मिळाले.’

च्डॉ. शिंदे म्हणाले, रुग्णांवर उपचार करताना मला १३८ व्या दिवशी कोरोनाची लागण झाली. १० दिवसांच्या उपचारानंतर मी कोरोनामुक्त झालो.
च्त्यानंतर मीही १० दिवस साताºयाला गेलो. तेथे कुटुंबीयांना भेटून होम क्वारंटाइन झालो. दहाव्या दिवशी पुन्हा मी पुन्हा रुग्णालयात परतलो. तेव्हापासून आजपर्यंत ४७ दिवस रुग्णांवर उपचार केले आहेत.

डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून मिळाला रुग्णसेवेचा धडा
रुग्णसेवेची ही प्रेरणा कुठे मिळाली? असे डॉ. शिंदे यांना विचारताच ते म्हणाले, मी एका लहानशा गावातून आलो. माझे विश्व उभे करण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याचदरम्यान मला डॉ. तात्याराव लहाने यांचा सहवास लाभला. त्यांच्याकडून रुग्णसेवेचा धडा मी घेतला असून, तो गिरवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.
या सगळ्या कोरोना लढाईत मला पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मला नमूद करावेसे वाटते की, डॉक्टर खासदार असल्यावर आरोग्य संकटाशी कसा सामना करू शकतो, हेच खासदार शिंदे यांच्या धडपडीतून दिसून आले.

Web Title: The doctor at Kovid Hospital did not go home for 138 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.