ठाणे : ठाण्यात उत्तर भारतीयांची संख्या वाढत असताना आणि जे कित्येक वर्षे पक्षाशी एकनिष्ठपणे वागत आहेत, अशांना तिकीट देण्याऐवजी भाजपाने केवळ पैसे घेऊन बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप नाराज झालेल्या भाजपाच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजपाला एकाही उत्तर भारतीयाने मतदान करू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. दुसरीकडे प्रभाग क्र. १७ आणि १८ मधील निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना नुकत्याच भाजपामध्ये दाखल झालेल्या नवख्यांकडून धमक्या येऊ लागल्याने येथील सुमारे २०० पदाधिकाऱ्यांनी मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत के.पी. शर्मा, स्वामी धर्मानंद, शशी यादव यांच्यासह इतर नाराज पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाने परप्रांतीयांवर अन्याय केल्याचा आरोप या वेळी सर्वांनी केला. तिकीट कापल्यानंतरही पक्षासाठी काम करीत असताना जे बाहेरून पक्षात आले, त्यांच्याकडून आता आम्हाला धमक्याही येऊ लागल्या असल्याचा आरोप प्रवीण तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
भाजपाला मतदान करू नका
By admin | Updated: February 20, 2017 05:48 IST