ठाणे : कोरोनामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत, अशातच त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी शिवसेना नगरसेवकाकडून चक्क प्रभागातील नागरिकांना मद्यवाटप केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या नगरसेवकाने शिवसेना आमदाराच्या कार्यालयात बसून हे मद्यवाटप केले आहे. शिवसेना नगरसेवकाच्या या कृत्याविरोधात आता येथील स्थानिक नागरिकाने थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु, ही घटना मागील वर्षीची असल्याचे सांगून ‘करायलो गेलो विडबंन आणि झाली विटंबना’ असे सांगून निवडणूक तोंडावर असल्याने आपली बदनामी केली जात असल्याचा उलट आरोप केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेकांची कुटुंबे मोडून निघाली आहेत. अनेकांचा रोजगार, नोकरी धंदा गेला आहे, त्यातून तो कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे. असे असताना ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना नगरसेवक दीपक वेतकर यांनी चक्क मद्याचे वाटप केले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील या नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयातच हा मद्यवाटपाचा कार्यक्रम केला. याच परिसरात राहणारे समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी याबाबत महापालिका आयुक्त, ठाणे पोलीस आणि उत्पादनशुल्क विभागाकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदाराच्याच कार्यालयात केल्याने रवींद्र फाटक यांच्यावरही टीका होत आहे. शहरात सत्ताधारी शिवसेनेसह इतर पक्षांतील अनेक लोकप्रतिनिधी हे गरीब आणि गरजूंना धान्य वाटप, जेवणवाटप तसेच काहीजण ऑक्सिजन व प्लाझ्मादान करीत असताना वेतकर हे चक्क मद्यवाटप करीत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षाची बदनामी झाली आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शिवसेना नगरसेवकाच्या या प्रतापावर टीका केली आहे. जनसेवेच व्रत घेणाऱ्या स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांना अशा माध्यमातून आजची शिवसेना तिलांजली देत आहे का? असा सवाल करून अशा नगरसेवकावर तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
........
मद्यवाटपाचे ते फोटो मागील वर्षाचे आहेत, आम्ही केवळ टाइमपास करीत होतो. केवळ विडंबन करण्याचा माझा हेतू होता. परंतु, त्याची विटंबना झाली आहे. त्यातही आता वर्षभरावर निवडणुका आल्याने मला बदनाम करण्यासाठीच कोणीतरी हे कृत्य केले आहे.
दीपक वेतकर, नगरसेवक, शिवसेना