विरार : वसई तालुक्यात राजोडी, वालीव आणि गोखीवरे परिसरातील बंगल्यांमध्ये गावठी दारु बनवणाऱ्या भट्ट्या पोलिसांनी उध्वस्त केल्या. धक्कादायक बाब म्हणजे यात घरातील महिलाही गुंतल्याचेही उजेडात आले आहे. गावठी दारूसह देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्या सहा ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून काळा गूळ, नवसागरमिश्रित रसायन, तांब्याचे भांडे ,ड्रम मिळून २ लाख ६१ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच महिला आणि दोन पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजोडी येथे केळीच्या वाडीत प्रेसिला रॉड्रिक्स यांना दोनशे लिटरचे आठ ड्रम व १०० लिटरच्या दहा ड्रममध्ये काळा गूळ व नवसागर मिश्रित रसायन वापरून अडीच हजार लीटर गावठी दारू बनवून विक्री करण्याच्या तयारीत असतांना पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी १ लाख ३२ हजर १०० रुपयांचां मुद्देमाल जप्त करण्यात आला. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोखिवरे येथील खालची आळी येथे सुगंधा जितेंद्र भोईर यांच्या घरातून देशी विदेशी आणि काळा गूळ व नवसागर मिश्रित रसायन वापरून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे ५७ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी कारवाई करत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षिका प्रियंका मीना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत लांघी यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न नरेश भोईर व त्यांच्या पत्नीने केला. शिवाय कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगून धक्काबुक्की करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी नरेश भोईरच्या घरीही छापा मारला. हे घर नरेशची आई जनाबाई भोईर यांच्या नावावर आहे. पोलिसांनी घरातून १२ हजार सहाशे पन्नास रुपयांचा काळा गूळ व नवसागर मिश्रित रसायन जप्त केले. तर शेजारील हंसाबाई दाजी भोईर यांच्या घरातून काळा गूळ व नवसागर मिश्रित रसायन मिळून २१ हजार एकशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर किसन भोईर यांच्या घरातून गावठी दारु बनवण्यासाठी लागणारा ३८हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (वार्ताहर)
हातभट्ट्या उद्ध्वस्त, सात अटकेत
By admin | Updated: February 9, 2017 03:47 IST