ठाणे : महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षांत विकासात्मक कामे केल्यानेच विधानसभा निवडणुकीत मतदारांनी चांगला काैल दिला. महाविकास आघाडी ही नव्हतीच. ते केवळ निवडणुकीसाठी एकत्र आले हाेते. लाेकसभा निवडणुकीत त्यांनी केलेली फेकाफेकी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी बंद पाडली. आम्हाला नवीन आव्हाने स्वीकारण्याची सवय असल्याचा टाेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधकांना रविवारी लगावला.
ठाण्यात सिंघानिया समुहातर्फे झालेल्या व्हिंटेज आणि सुपर कारच्या प्रदर्शनाला शिंदे यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध उद्याेगपती गाैतम सिंघानिया यांच्यासमवेत त्यांनी व्हिंटेज कारचा थरार अनुभवला. यावेळी एका रेसिंग कारचे ड्रिफ्टींगही त्यांनी केले. सुपरकार, सुपर बाइक आणि विंटेज कार चालविण्याचा नवा अनुभवही त्यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेही उपस्थित हाेते.
ठाण्यात १० ते १२ जानेवारी असे तीन दिवस व्हिंटेज कार आणि बाइकच्या प्रदर्शनाचे आयाेजन केले हाेते. यात एक हजार काेटींच्या ३२० प्रकारच्या १२५ वर्षांपेक्षा जुन्या विंटेज कारचा तसेच अत्याधुनिक सुपर कार आणि बाइकचा समावेश हाेता. शिंदे यांना बाइक आणि व्हिंटेज कारचे सारथ्य केल्याचे पाहून ठाणेकरांनी त्यांना चांगलीच दाद दिली.