लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदर शहरात रुग्णांना ऑक्सिजनची टंचाई भासू नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ऑक्सिजन प्लांट उभारला असून, त्याचे लोकार्पण पुढील ३ ते ४ दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालिका आयुक्त, तहसीलदार आदींच्या उपस्थितीत प्रकल्पाचे प्रात्यक्षिक झाले. दररोज १२० सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती त्यातून होणार असून, शहरातील नागरिकांना हे ऑक्सिजन सिलिंडर शिवसेनेतर्फे मोफत दिले जाणार आहेत.
प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मीरा रोडच्या हाटकेश भागातील मंगलनगर येथे सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. परदेशी बनावटीचा हा प्लांट कसा चालेल, कसे हवेतून ऑक्सिजन निर्माण करून ते सिलिंडरमध्ये भरले जाईल, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी आ. सरनाईक, महापालिका आयुक्त दिलीप ढोले, तहसीलदार नंदकुमार देशमुख उपस्थितीत होते.
कमीत कमी जागेत हा प्लांट बसविण्यात आला असून, २४ तास त्यातून ऑक्सिजन मिळणार आहे. रिकामे सिलिंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलिंडर येथून दिले जातील, असे सरनाईक यांनी सांगितले.