युतीच्या निर्णयावरच अवलंबून आहे समीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:17 AM2019-08-30T00:17:07+5:302019-08-30T00:17:18+5:30

भाजपने लावली प्रतिष्ठा पणाला : गतवैभव प्राप्त करण्यासाठी राष्ट्रवादीचा संघर्ष, सेनेत इच्छुकांची गर्दी

The decision of the Alliance depends on the equation | युतीच्या निर्णयावरच अवलंबून आहे समीकरण

युतीच्या निर्णयावरच अवलंबून आहे समीकरण

Next

पंकज पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांना निसटता विजय मिळाला होता. त्यावेळी शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली होती. यावेळी युती झाल्यास शिवसेनेसाठी सोयीचे ठरणार आहे. मात्र, युती तुटल्यास पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ दोन्ही पक्षांच्या उमेदवारांवर येणार आहे. या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपचे पदाधिकारीदेखील प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. युतीच्या निर्णयानंतरच या मतदारसंघातील खरी लढत निश्चित होणार आहे.


अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर पूर्वी काँग्रेसचे आणि नंतर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यावर शिवसेनेतर्फे डॉ. बालाजी किणीकर यांना उमेदवारी देण्यात आली. मतदारसंघ राखीव झाल्याने राजकारणात सक्रिय असलेल्या अनेकांना निवडणुकीतून बाहेर पडण्याची वेळ आली. निवडणुकीच्या दोन वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय झालेल्या डॉ. किणीकर यांना उमेदवारी मिळाल्याने या मतदारसंघातील ध्येय निश्चित करण्याचा शिवसेनेचा मार्ग सरळ झाला. २००९ च्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळत किणीकर यांना ५० हजार ४७० मते मिळाली होती. प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार महेश तपासे यांना ३० हजार ४९१ मते मिळाली. पहिल्याच निवडणुकीत किणीकर यांचा मोठा विजय झाला होता. शिवसेनेला आपला मतदारसंघ कायम ठेवण्यात यश आले होते. तत्पूर्वी, २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे किसन कथोरे यांनी साबीर शेख यांचा पराभव करून या मतदारसंघावर कब्जा मिळवला होता.

राष्ट्रवादीकडे गेलेला मतदारसंघ पुन्हा मिळवण्यात किणीकर यांना यश आले होते. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर किणीकर यांना पुन्हा २०१४ च्या निवडणुकीसाठी सेनेने पुढे केले. मात्र, युती झालेली नसल्याने ही निवडणूक किणीकर यांना सोपी नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात लढणाऱ्या किणीकर यांना २०१४ च्या निवडणुकीत मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात लढावे लागले. २००९ च्या निवडणुकीत २० हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या किणीकर यांना २०१४ च्या निवडणुकीत चांगलाच घाम फुटला होता. २०१४ च्या निवडणुकीत किणीकर यांच्याविरोधात भाजपने राजेश वानखेडे यांना पुढे केले होते. काँग्रेसने कमलाकर सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीने पुन्हा महेश तपासे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. चार प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्यात व्यस्त असताना किणीकर यांना विजयाचा झेंडा कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या निवडणुकीत किणीकर यांना ४७ हजार मते मिळाली, तर राजेश वानखेडे यांना ४४ हजार ९५९ मते मिळाली. अवघ्या दोन हजारांच्या फरकाने किणीकर विजयी झाले. या विजयामुळे शिवसेनेला आपला मतदारसंघ पुन्हा अबाधित राखण्यात यश आले. विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर भाजपला सुगीचे दिवस आले. ज्या अंबरनाथ शहरात भाजपला नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नव्हते, त्याच शहरात भाजपकडे ओढा वाढला. भाजपचा पराभव झाला असला तरी, संघटनवाढीसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरला. आज पक्ष संघटनेच्या दृष्टीने शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे पक्ष भक्कम झाले आहेत. राष्ट्रवादी मात्र गतवैभव प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत आहे.


लोकसभा निवडणुकीत युतीच्या वाट्याला ८६ हजार, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ३१ हजार मते आली. या मताधिक्याचा विचार करता युतीमध्ये सेनेला विधानसभा सोयीची होणार आहे. आघाडीची आणि युतीची एकत्रित मते पाहता यात ५० हजार मतांची तफावत दिसते. हे मताधिक्य विद्यमान आमदारांसाठी सोयीचे ठरणार असून, आघाडीच्या वाट्याला पूर्वीपेक्षा जास्त संघर्ष येण्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी शिवसेना उमेदवाराने आपल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपमध्ये काही उमेदवार युती तुटण्याची वाट पाहत आहेत. युती तुटली तर, उमेदवारी मिळवण्यासाठी राजेश वानखेडे हे भाजपच्या इच्छुकांच्या यादीत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेले सुमेध भवार हेदेखील इच्छुकांमध्ये आहेत. भवार यांनी याआधी रिपाइं आठवले गटामार्फतदेखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. रामदास आठवले यांनी भाजप-रिपाइंतर्फे भवार हे उमेदवार राहतील, अशी घोषणादेखील केली होती. मात्र, ज्यावेळी घोषणा झाली, त्याच सभेत आठवले यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे घोषित झालेली उमेदवारी त्याचवेळी हवेत विरली होती. त्यानंतर, भवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. माजी सहायक पोलीस आयुक्त दिलीप जगताप हेदेखील भाजपकडूनच इच्छुक आहेत.

आघाडीतर्फे गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला १५ हजार ७४०, तर राष्ट्रवादीचे महेश तपासे यांना अवघी आठ हजार ७२२ मते मिळाली. त्यामुळे मताधिक्याच्या जोरावर काँग्रेस दावा करत आहे. काँग्रेसने युवा नेतृत्व रोहित साळवे आणि अनिता जाधव या दोघांची नावे पुढे केली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील हा मतदारसंघ पुन्हा आपल्यालाच मिळावा, यासाठी आग्रह करत आहे. राष्ट्रवादीतर्फे पुन्हा एकदा महेश तपासे आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले कमलाकर सूर्यवंशी यांचे नाव पुढे केले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे एकत्रित लढले आणि शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्यास या ठिकाणी आघाडीला मतविभाजनाचा लाभ होणार आहे.

Web Title: The decision of the Alliance depends on the equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.