प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील चंदनवाडी परिसरात एका महिला ग्राहकाला चक्क पावांमध्ये मेलेल्या माशा आढळल्याचा किळसवाणा प्रकार आज भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांनी उघडकीस आणला. या पावात एक दोन नव्हे तर चक्क तीन मेलेल्या माश्या होत्या.
सकाळी चंदनवाडी येथील एक महिला नेहमीप्रमाणे पाव खरेदी करायला गेली होती. त्यावेळी तिला त्या पावात मेलेली माशी दिसली. तिने पाव पुन्हा तपासल्यावर तिला एक, दोन नव्हे तर चक्क तीन मेलेल्या माशा आढळल्या. यावेळी ती विक्रेत्याला मेलेल्या माशा असलेला पाव दाखवत होती मात्र पाव विक्रेता ते मानायला तयार नव्हता त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा प्रकार कदम यांच्या नजरेस पडला असता त्यांनी पाव विक्रेत्याला याबद्दल जाब विचारला आणि त्यांनी देखील स्वतः पाव तपासला असता त्यांनाही तीन मेलेल्या माशा या पावांमध्ये दिसून आल्या. यावेळी त्यांनी पाव विक्रेत्याला विचारले असता तो राबोडी येथून पाव आणत असल्याचे त्यांनी सांगितले. कदम म्हणाले की, या पाव विक्रेत्याला विचारल्यावर त्याने प्रामाणिकपणाने हा प्रकार कबूल केला त्यामुळे त्याला आज सोडून देण्यात येत आहे मात्र ज्या बेकरीतून त्याने पाव विकण्यासाठी आणले त्याला हा व्हिडिओ दाखवून पुढची कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणाले की, ठाणेकरांनी अशा घाणेरड्या, निकृष्ट दर्जाच्या ठिकाणचे पाव खाण्यापेक्षा पाव खाण्यापेक्षा आपल्या घरची चपातीच खा.