ठाणे : धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा विवेकी विचार खूप विरोध असतानाही विपरित परिस्थितीत पाय रोवून खंबीरपणे रुजवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्याचाच आजन्म ध्यास ज्यांनी घेतला, त्या दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी, याचा जास्त खेद वाटतो, असे मत मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने ठाण्यातील संवेदनशील संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन लोकजागर उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या २० तारखेला हा उपक्रम होणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी ‘महात्मा गांधी ते डॉ. आंबेडकर व्हाया हमीद दलवाई, दाभोलकर, कलबुर्गी व पानसरे’ या विषयावर परिसंवाद मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात रंगला होता. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कुठल्याही धर्माच्या विरोधी नाही. परंतु, सर्व धर्मांच्या चुकीच्या चालीरीती, रूढीपरंपरांना समितीने विरोध नक्कीच केला. म्हणूनच, समाजातील प्रतिगामी शक्तींनी समितीची नेहमीच बदनामी केली. त्याचा त्रास डॉ. दाभोलकरांना सतत झाला. तरीही, पुरोगामी विचार हा समाजाला पुढे नेणारा आहे, हे पटवून देण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. वृत्तीने धार्मिक असला तरी विचाराने प्रतिगामी नसलेला खूप मोठा वर्ग काम करतो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व लोकशाही या मूल्यांची राखण करण्यासाठी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेऊन सर्वांना कर्तव्य व हक्काची जाणीव करून प्रतिगामी शक्तींना विरोध करण्याची सामायिक कृती करायला हवी, असे मतही मुक्ता यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
‘दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी याचा खेद’
By admin | Updated: January 24, 2017 05:49 IST