मातांच्या अमृत आहारासाठी सेविकांवर उधारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:52 PM2019-12-26T23:52:37+5:302019-12-26T23:53:11+5:30

कसे होणार कुपोषण निर्मूलन : सेविकांवर उपासमारीची वेळ

Crisis on credit for maternal nectar feeding malnutrition | मातांच्या अमृत आहारासाठी सेविकांवर उधारीचे संकट

मातांच्या अमृत आहारासाठी सेविकांवर उधारीचे संकट

Next

ठाणे : कुपोषण दूर करण्यासाठी शासनाने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना लागू केली आहे. याद्वारे गरोदर मातांसह स्तनदा माता व अंगणवाडीतील कुपोषित बालकांना अंडी, केळी आदींचा आहार दिला जात आहे. यासाठी माता व बालके रोज केंद्रात येऊन बसतात. त्यांना हा आहार रोज द्यावा लागत असल्यामुळे अंगणवाडीसेविका, महिला बचत गटाला दुकानदारांकडून हा आहार रोज उधारीने घेऊन पुरवठा करावा लागत आहे.

तो न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी प्रकल्प अधिकाऱ्यांकडून दिली जात असल्याचे वास्तव आहे. याशिवाय, मानधनही वेळेत मिळत नसल्यामुळे सेविका व महिला बचत गटाच्या महिलांना उपासमारीला तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.
प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी स्वत: कर्ज करून अंगणवाडीसेविका तर काही ठिकाणी महिला बचत गटातील महिलांना करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सेविकांना अजूनही भाऊबीज मिळालेली नाही. जुलैपासून तब्बल सहा महिन्यांपासून अमृत आहाराचा निधी खात्यात जमा झालेला नाही. डीएडीएची रक्कम २०१७ पासून मिळालेली नाही.

अंगणवाडी संघाने दिला मोर्चाचा इशारा
यावर प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी व्यक्त केले. या प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील शेकडो सेविका जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करणार आहेत. नोकरी जाऊ नये म्हणून सेविका उसनवारीने, कर्जाने रक्कम घेऊन गरोदर माता, स्तनदा मातांना अमृत आहार रोज देत आहेत. मात्र, त्या स्वत: उपासमारीने हैराण आहेत. शासनाची कुपोषण निर्मूलनाची योजना या सेविका स्वत:चा पैसा खर्च करून राबवत असल्याचेच वास्तव सिंह यांनी उघड केले आहे. यावर त्वरित उपाययोजना न केल्यास मोर्चाचा इशारा
त्यांनी दिला.

सर्वच प्रकल्पांत बोंब : गरम ताजा आहार कल्याणला गेल्या वर्षीच्या जूनपासून मिळत नाही. अंबरनाथला मार्चपासून तर मुरबाड १ व प्रकल्प २ ला जूनपासून गरम ताजा आहार मिळालेला नाही. भिवंडी प्रकल्प १ मध्ये एप्रिलपासून तर शहापूर, डोळखांबला जुलैपासून गरम ताजा आहार मिळत नसून एक वर्षापासून सेविकांना त्यांचा टीएडीएही मिळत नसल्यामुळे या सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वच प्रकल्पांत ही बोंब आहे.
 

Web Title: Crisis on credit for maternal nectar feeding malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे