उल्हासनगर : शहरात गंभीर होत जाणाऱ्या पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय सभेला निम्म्या नगरसेवकांनी दांडी मारून आपल्याला हा प्रश्न सोडवण्यात किती रस आहे, ते दाखवून दिले. नगरसेवक, सामाजिक संस्थांनी पाणीप्रश्नी केवळ आंदोलने-मोर्चे न काढता निवेदनाद्वारे भावना पोहोचवण्याचा टोला आयुक्त हिरे यांनी लगावला. तर, पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याचा इशारा दिला. उल्हासनगरात पाणीटंचाईने हाहाकार माजला असून मोर्चे, आंदोलने, उपोषण, रस्ता रोखण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यावर, तोडगा काढण्यासाठी व जनजागृतीसाठी आयुक्त हिरे यांनी बैठक बोलावली होती. पण, टंचाईप्रकरणी नेहमी आक्रमक असणाऱ्या बहुतांश नगरसेवकांनी तिला दांडी मारली. पुन्हा संरक्षणाची मागणीपालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि काही नगरसेवकांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. शहर अभियंता कलई सेलवन यांच्यासह बी.एस. पाटील, एम.एस. बसनगार, जी.पी. सुंदरम, आर.एन. वानखडे, एम.ए. खियानी, एच.टी. सभागणी, आर.बी. तिजोरे, चंद्रगुप्त सोनावणे आदींनी आक्रमक कार्यकर्त्यांमुळे जीव धोकयात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलीस संरक्षण द्या, नाहीतर आमच्या मूळ खात्यात परत पाठवण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
पाण्यावरील चर्चेला नगरसेवकांची दांडी
By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST