- सदानंद नाईकउल्हासनगर : रेडक्रॉस हॉस्पिटल येथील कोरोना स्वॅब सेंटरवर संशयित नागरिकांची स्वॅब देण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र असून त्याठिकाणी नागरिकांना बसण्याची व पाणी पिण्याची काही एक सुविधा नसल्याचे उघड झाले. नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिले. शहरात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारपेक्षा जास्त झाली. तर, दररोज २०० च्या आसपास कोरोना रुग्ण नव्याने मिळत आहेत. दरम्यान, नागरिकांत कोरोनाबाबत जनजागृती झाल्याने ते स्वतःहून उल्हासनगर महापालिका सेंटरवर जाऊन चाचणीसाठी स्वॅब देत आहेत. त्यामुळे सेंटरमध्ये गर्दी होत आहे. मात्र, या स्वॅब केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना बसण्याची व पाणी पिण्याची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून त्यांना सोयीसुविधा देण्याचे आश्वासन महापालिका वैद्यकीय अधिकारी पगारे आणि डॉ. राजा रिजवानी यांनी दिले. सुटीच्या दिवशी लसीकरण सुरू ठेवामनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी रविवारसह अन्य सरकारी सुटीच्या दिवशीही लसीकरण प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी महापालिकेकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.१३ हजार लसीकरणमहापालिकेने १३ हजार नागरिकांचे लसीकरण ३ मार्चपूर्वी केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली. तसेच लसीकरणाची प्रक्रिया वाढविण्याचे संकेत दिले. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले असून त्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पालिका शाळेत कोविड आरोग्य केंद्रउल्हासनगर महापालिका शाळा क्र. २८ व १४ मध्ये नव्याने आरोग्य केंद्र सुरू करण्याचे संकेत वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिले. तेथे ३०० पेक्षा जास्त बेड राहणार असून लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
CoronaVirus News: ‘रेडक्रॉस’मधील स्वॅब सेंटरमध्ये सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:29 IST