लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घरापासून दूर राहून ‘वुई आर फॉर यू’च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिवसरात्र सेवा देणाऱ्या किरण नाकती या कोरोनायोद्धाची २४० दिवसांनी घरवापसी झाली. कोरोनाग्रस्तांचा, त्यांच्या नातेवाइकांचा आधारवड बनलेला हा योद्धा ठाणेकरांना विविध प्रकारच्या १५ सेवा देत असून त्या निरंतर सुरू ठेवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरल्यावर ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी नाकती यांनी निःस्वार्थ सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मास्कवाटप केले. २१ मार्चपासून त्यांनी वुई आर फॉर यूच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिवसरात्र सेवा देण्याचा विडा उचलला. जसजशा गरजा लक्षात आल्या, तसतशी त्यांच्या सेवेमध्ये भर पडत गेली. घरपोच किराणा देणे, आपत्कालीन परिस्थितीत मोफत रिक्षासेवा, ज्येष्ठ नागरिकांना टिफिनसेवा, ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांना मोफत जेवणाचे डबे पोहोचविणे, घरपोच भाजीपाला, कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास तो परिसर मोफत निर्जंतुकीकरण करून देणे, घरपोच औषध पोहोचविणे अशा १५ सेवा त्यांनी ठाणेकर विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना देण्यास सुरुवात केली.
कुटुंबातील सदस्य कोरोनाग्रस्त आढळल्यास त्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण होऊ नये म्हणून कोरोना समुपदेशन त्यांनी सुरू केले. रुग्णांना दाखल करून देण्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी समन्वयकाचीही भूमिका निभावली. ही सेवा करण्यासाठी ते आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहिले आणि बघताबघता २४० दिवस झाले.
सेवा राहणार निरंतरnदिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल आठ महिन्यांनी किरण नाकती यांनी घरवापसी केली. त्यांना घरी परतल्याचे पाहून त्यांची आई, पत्नी संध्या नाकती, मुले आदित्य आणि अथर्व यांनी आनंद व्यक्त केला. nघरापासून दूर राहून ठाणेकरांची कुटुंबाप्रमाणे काळजी करणारे नाकती म्हणजे खरा कोरोनायोद्धा अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. नाकती हे घरी परतले असले, तरी त्यांची ठाणेकरांसाठी करत असलेली सेवा निरंतर सुरूच राहणार आहे.