मुंब्रा : येथील कौसा क्रीडा संकुलातील कोरोना लसीकरण केंद्राच्या समन्वयक डाॅ. शार्मिन डिंग्गा यांनी केंद्रातील लसींच्या मात्रा दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी येथील शहा हेअर प्लान्ट क्लिनिकमध्ये ठामपाच्या वैद्यकीय तपासणी पथकाला आढळून आलेल्या ५० मात्रा या केंद्रातील नसून, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ५ ऑगस्टला आयोजित केलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत शिल्लक राहिलेल्या त्या मात्रा असून, त्या डाॅक्टर तसेच त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार होत्या, अशी माहिती डिंग्गा यांनी लोकमतला दिली. दरम्यान, शनिवारी येथील केंद्रावर लसींच्या आलेल्या मात्रांच्या तुलनेत कमी कुपन वाटले गेल्याचा आरोप रांगेत उभे असलेल्या काही जणांनी केला होता. यामुळे केंद्रावर काही काळ गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
मुंब्य्रातील लसीकरण केंद्राच्या समन्वयक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST