मीरारोड - मीरारोड मेट्रो मार्गिके खालील साईबाबा नगर ते शिवार उद्यान पर्यंतच्या उड्डाणपुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांना उदघाटनासाठी वेळ मिळत नसल्याने राखडल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्यमंत्री यांचे मुखवटे घालून निदर्शन केले.
मीरा भाईंदर मेट्रो मार्गिके खाली तीन उड्डाणपूल असून त्या पैकी प्लेझन्ट पार्क ते साईबाबा नगर ह्या पुलाचे गेल्याच वर्षी उदघाटन झाले . तर साईबाबा नगर ते शिवार उद्यान दरम्यानचा उड्डाणपूल हा तयार झाला असून उदघाट्नच्या प्रतीक्षेत आहे . आधीच मेट्रो मार्गिका आणि त्याखालील उड्डाणपूल मुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून त्याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी लोकांना सहन करावी लागत आहे . त्यामुळे हा उड्डाणपूल खुला झाल्यास वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
परंतु उदघाटनाच्या प्रतीक्षेत हा उड्डाणपूल धूळखात पडला आहे . मीरा भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे यांच्या नेतृत्वाखाली दिपक बागडी, निनाद जाधव, यशपाल सुरेका, किरण परुळेकर, बॉबी सिंग, विशाल मौर्या, पुनित पंड्या, भीमराव तायडे, विकास छजलाना, अभी वानखेडे, विपीन राय, ब्रेन्डन डिकॉस्टा आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उड्डाणपूल सुरु केला जात नसल्याचा निषेध केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे लावून पुलाच्या उदघाटनासाठी कधी येणार ? असा सवाल केला . भाजप आमदाराच्या चमकोगिरीसाठी पूल खुला केला जातो मात्र रोजच्या यातना भोगणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी मात्र पूल खुला केला जात नाही असा आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी सामान्य माणसांनी किती त्रास सहन करायचा ? असा सवाल राणे यांनी केला .