बिर्लागेट : कल्याण तालुक्यातील एकशे एक गावांसाठी वरदान ठरलेल्या गोवेली ग्रामीण रुग्णालयाची प्रचंड दुर्दशा झाली असून या रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या एका दवाखान्याचा पदभार असल्याने त्यांच्या गैरहजेरीत मात्र रुग्णालयाचे कर्मचारी यथाकथीत पुढाऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानत असल्याने गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होतात. कल्याण तालुक्यातील १०१ गावे १९ पाड्यातील १ ते दीड लाख लोकांसाठी १९९२ च्या आसपास गोवेली ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र अनेकदा रुग्णालयास पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळाला नाही. रुग्णालयात ३२ कक्ष आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिक्षक कक्ष, ड्युटी वैद्यकीय कक्ष, नर्सिंग स्टेशन, स्पेअर, औषध भंडार, क्षयरोग विभाग, प्रयोगशाळा, पुरुष-स्त्री कक्ष, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रीया, नेत्र विभाग, क्ष किरण कक्ष, असे ३० ते ३५ विभाग आहेत. मात्र ते नावापुरतेच असून कोण कधी येतो, काय करतो याचा कोणाला पत्ता लागत नाही.या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक थोरात यांच्याकडे गोवेलीसह अंबाडी येथील पदभार आहे. मात्र, ते कधी रुग्णालयात असतात हे त्यांनाच ठाऊक? त्यांच्या या गोष्टीचा फायदा इतर वैद्यकीय कर्मचारी बरोबर उचलतात. सध्या पावसाळा असल्याने रुग्णालयात प्रचंड गर्दी असते. दिवसाला १०० ते २०० रुग्णांची नोंद होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.हिवताप, मलेरिया, कावीळ, अतिसार, सर्प दंश, विंचू दंश याचे प्रमाणही पावसाळ्यात वाढते. अशा वेळी हे कर्मचारी रुग्णांकडे लक्ष न देता स्वयंघोषीत नेते, पुढाऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानतात. विशेष म्हणजे रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती आहे. मात्र ती केवळ भींतीवर, प्रत्यक्षात या समितीच्या बैठका होतात का? रुग्णांचे काय कल्याण होते हा संशोधनाचा विषय ठरावा.या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांना विचारले असता त्यांनी गोवेलीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अंबाडीचा पदभार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यामुळे इतके दिवस रुग्णांना सेवा न देणाऱ्या अशा कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्याला तालुक्यातून हलवावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गोवेली ग्रामीण रुग्णालयाची दशा
By admin | Updated: August 18, 2015 23:21 IST