कासा : या तालुक्यातील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित धुंदलवाडी येथील आश्रम शाळेस मुंबई येथील एका ट्रस्टने संगणक कक्ष व इ-लर्निंग केंद्र दिले आहे. त्याचे उदघाटन आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी डहाणू आँचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. संगणक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. आदिवासी मुलांना स्पर्धांयुगात ते देणे आवश्यक असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.तसेच देणगी देणाऱ्या संस्थेचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर शाळेच्या नवीन कार्यालयाचे उदघाटनही या वेळी करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव आप्पा भोये ट्रस्टचे व्यवस्थापक जिमसन लोपीस शाळेचे मुख्याध्यापक उल्हास सातवी, जे.डी. पगारे, शिक्षक व अधीक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा प्रधान यांनी केले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टमार्फत विविध शाळांना शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते. गेल्या पाच वर्षांपूर्वी पासून या संस्था डहाणूतील आदिवासी भागातीलशाळांना मदत करते. या संगणकाचा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा ट्रस्टने व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
धुंदलवाडी आश्रमशाळेस संगणक
By admin | Updated: December 26, 2016 06:02 IST