वस्तीत कोरोना विलगीकरण केंद्र सुरू करण्यास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:21 AM2020-06-02T00:21:32+5:302020-06-02T00:21:40+5:30

बेतवडेतील रहिवासी आक्रमक : पोलिसांना रोखल्याने तणाव

Citizens oppose start of Corona Separation Center in the settlement | वस्तीत कोरोना विलगीकरण केंद्र सुरू करण्यास नागरिकांचा विरोध

वस्तीत कोरोना विलगीकरण केंद्र सुरू करण्यास नागरिकांचा विरोध

Next

ठाणे : बेतवडे गावालगत असलेल्या रुणवाल गृहसंकुलात ठाणे महापालिकेला विलगीकरण केंद्र सुरू करण्यास रहिवाशांनी सोमवारी विरोध केला. यावेळी गृहसंकुलातील १०० ते १५० रहिवाशी प्रवेशद्वारावर विरोध करण्यासाठी जमल्याने महापालिकेने पोलिसांना पाचारण केले. मात्र, त्यांनी विरोध कायम ठेवून महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांनादेखील देता प्रवेशद्वारावरच रोखल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या गृहसंकुलासह आजूबाजूच्या दोन गावांमध्ये एकही रुग्ण नसताना या परिसरात विलागीकरण केंद्रांचा घाट का घातला जात आहे, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.


या गृहसंकुलात १० इमारती आहेत. त्यापैकी ५ इमारतींमध्ये १५० कुटुंब वास्तव्यास आहेत. उर्वरीत पाच इमारती रिकाम्या असून त्यांचा ताबा ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या टाळेबंदी असल्यामुळे या पाच इमारतींमध्ये काही कुटुंब राहण्यास आली नाहीत. टाळेबंदीत सर्वच सदस्यांनी नियमांचे पालन केले आहे. बाहेरील व्यक्तिला इमारतीत प्रवेशही दिला नाही. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीदेखील बाहेर पडलेलो नाही. किराणा, भाजीपाला आणि दूधविक्रेत्यांना आवारात प्रवेश दिलेला नाही. प्रवेशव्दारावर जाऊन आम्ही स्वत: या वस्तू खरेदी करतो. मात्र, या ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारला तर आरोग्याचा प्रश्न उभा राहील, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले. दरम्यान, या परिसरातील गावांचे जनजीवनही या केंद्रामुळे विस्कळीत होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.


पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
पोलीस व पालिका प्रशासनाने रहिवाशांचा विरोध झुगारून प्रवेशद्वाराचे टाळे तोडून गृहसंकुलात प्रवेश केला. यावेळी पोलीस व पालिका प्रशासनासोबत असलेल्या गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप गृहसंकुलातील रहिवाशांनी केला. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Citizens oppose start of Corona Separation Center in the settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.